नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेक F41 प्रकारात सुवर्ण पदक तर धावपटू सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्यपदक जिंकले.  Twitter
स्पोर्ट्स

भालाफेकमध्ये नवदीपचे रौप्यपदक झाले ‘सुवर्ण’! इराणचा पॅरा ॲथलीट अपात्र

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने पदक जिंकणे सुरूच ठेवले आहे. शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी भारताला 1 सुवर्णासह आणखी 2 पदके मिळाली. दोन्ही पदके ॲथलेटिक्समध्ये आली, ज्यामध्ये सर्वात मोठे यश भालाफेकपटू नवदीपला मिळाले. त्याने सुवर्णपदक जिंकले. नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेक F41 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते परंतु सुवर्ण जिंकणारा इराणी खेळाडू या स्पर्धेनंतर अपात्र ठरला. अशा प्रकारे नवदीप सिंगचे रौप्यपदकाचे सुवर्णपदकामध्ये रुपांतर झाले. दुसरीकडे धावपटू सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले. यासह भारताच्या पदकांची संख्या 29 वर पोहोचली आहे.

पॅरिस गेम्स रविवार, 8 सप्टेंबर रोजी संपणार आहेत, परंतु त्याच्या एक दिवस आधीही भारतीय खेळाडूंची ताकद दिसून आली. जलतरण, सायकलिंग आणि कॅनोइंगमध्ये भारताला निराशेचा सामना करावा लागला, मात्र पुन्हा एकदा ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. याच स्टेडियममध्ये एका बाजूला नवदीप सिंग भालाफेकमध्ये पदकाच्या दिशेने वाटचाल करत होता, तर दुसऱ्या बाजूला सिमरन रेसिंग ट्रॅकवर आपल्या वेगवान धाव घेण्यासाठी सज्ज होती. योगायोगाने त्यांची दोन्ही पदके जवळपास एकाच वेळी आली.

भालाफेकमध्ये, नवदीपने त्याच्या दुसऱ्या थ्रोमध्ये 46.39 मीटरसह आघाडी घेतली, परंतु इराणच्या सदेघ बेट सयाहने 46.84 मीटरसह प्रथम स्थान हिसकावून घेतले. नवदीपने पुढच्या थ्रोमध्ये पुनरागमन केले आणि पुन्हा 47.32 मीटरसह पहिले स्थान गाठले. चौथ्या थ्रोमध्येही त्याला कोणीही मागे टाकू शकले नाही, पण पाचव्या थ्रोमध्ये इराणच्या खेळाडूने पुन्हा 47.64 मीटर फेक करून पहिले स्थान पटकावले. शेवटी त्याने सुवर्ण आणि नवदीपने रौप्यपदक जिंकले. मात्र, अल्पावधीतच पॅरालिम्पिक समितीने हा निकाल बदलला आणि इराणी खेळाडूला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून त्याला अपात्र ठरवले.

नवदीपचा चमत्कार

हरियाणातील पानिपत येथे राहणाऱ्या नवदीपची सुरुवात खूपच खराब झाली होती. त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला. यानंतर त्याने दुस-या प्रयत्नानत 46.39 मीटर लांब थ्रो केला. तिसऱ्या थ्रोमध्ये तो लयीत दिसला आणि त्याने 47.32 मीटरची दूर भाला फेकला. त्याचा चौथा आणि सहावा प्रयत्न थ्रो फाऊल ठरका. यादरम्यान त्याने पाचवा फेक 46.05 मीटरवर लांब टाकला.

आक्षेपार्ह ध्वज प्रदर्शित

आक्षेपार्ह ध्वज वारंवार प्रदर्शित केल्याबद्दल इराणी खेळाडू साया याला अपात्र ठरवण्यात आले. त्याने असे कृत्य करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. पॅरालिम्पिकच्या नियमांच्या विरोधात असलेल्या या ध्वजासह सायाला राजकीय संदेश द्यायचा होता, असा दावा करण्यात आला होता. सायाने हे केल्यावर त्याचे सुवर्ण पदक काढून घेण्यात आले. यानंतर भारताच्या रौप्य पदक विजेत्या नवदीपला सुवर्णपदक विजेता घोषित करण्यात आले. तर कांस्यपदक जिंकणाऱ्या चीनच्या पेंग्झियांगला आता रौप्य आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या इराकच्या नुखैलावी वाइल्डनला कांस्यपदक देण्यात आले.

100 मीटरमध्ये निराशा, 200 मीटरमध्ये सिमरन चमकली

सिमरन शर्माने अखेर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकावर मोहोर उमटवली. दोनच दिवसांपूर्वी 100 मीटरच्या अंतिम फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. ती चौथ्या स्थानावर राहिली होती. मात्र, 200 मीटरच्या शर्यतीत तिने चमकदार कामगिरी केली. सिमरनने तिचा मार्गदर्शक अभय सिंगसोबत 200 मीटरची शर्यत 24.75 सेकंदात पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे सुवर्ण क्युबाच्या ओमारा ड्युरंडने (23.62 सेकंद) आणि रौप्यपदक व्हेनेझुएलाच्या अलेजांड्रा पेरेझने (24.19) पटकावले.

भारताच्या खात्यात 29 पदके

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 29 पदके जिंकली आहेत. यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत 15 व्या क्रमांकावर आहे. चीन 91 सुवर्ण पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. ग्रेट ब्रिटनने 46 सुवर्णपदके जिंकली असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT