Aman Sehrawat Suspended | पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता अमन सेहरावतवर एका वर्षाची बंदी 
स्पोर्ट्स

Aman Sehrawat Suspended | पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता अमन सेहरावतवर एका वर्षाची बंदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या अमन सेहरावतला जागतिक वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत वजन गटात अपयशी ठरल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी एक वर्षासाठी निलंबित केले आहे. पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल गटातील भारताच्या पदकाचा दावेदार असलेल्या 22 वर्षीय अमनला स्पर्धेच्या दिवशी निर्धारित वजनाच्या मर्यादेपेक्षा 1.7 किलो जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. यावरून ही कारवाई करण्यात आली. निलंबनाच्या या कालावधीत, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर डब्ल्यूएफआयने आयोजित केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास अथवा त्याशी संलग्न राहण्यास सक्त मनाई आहे, असे डब्ल्यूएफआयने नमूद केले आहे.

23 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्राद्वारे डब्ल्यूएफआयने अमनला या चुकीबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. महासंघाने सांगितले की, 29 सप्टेंबरला त्याने सादर केलेले उत्तर त्यांच्या शिस्तपालन समितीला ‘असमाधानकारक’ आढळले. आपले 29 सप्टेंबर 2025 रोजीचे उत्तर शिस्तपालन समितीने योग्यरीत्या तपासले. तसेच, मुख्य प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षक कर्मचार्‍यांकडूनही स्पष्टीकरणे घेण्यात आली. सखोल तपासणीअंती, समितीला आपले उत्तर असमाधानकारक आढळले असून, कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक जगमेंदर सिंग आणि इतर तीन प्रशिक्षक सदस्य विनोद, वीरेंद्र आणि नरेंद्र- यांनाही अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीदरम्यान वजन व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यात अपयश का आले, याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT