Paris Olympics 2024 Archery
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजी महिला संघाने पात्रता क्रमवारीत चौथे स्थान पटकावले. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.  Twitter
स्पोर्ट्स

Paris Olympics 2024 : भारतीय महिला तिरंदाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 Archery : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली. गुरुवारी (दि. 25) भारताच्या मोहिमेला तिरंदाजीने सुरुवात झाली. भारतीय तिरंदाजी महिला संघाने पात्रता क्रमवारीत कोरिया, चीन आणि मेक्सिको यांच्यानंतर चौथे स्थान पटकावले. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.

  • टीम रँकिंगमध्ये भारत चौथ्या स्थानावर राहिला

  • अंकिता वैयक्तिक क्रमवारीत 11व्या स्थानी राहिली

  • दीपिका कुमारी चमकदार कामगिरी करण्यात अपयशी

महिला तिरंदाज अंकिता भक्त, भजन कौर आणि दीपिका कुमारी या त्रिकुटाने रँकिंग राऊंडमध्ये आश्वासक प्रदर्शन केले. तिघींनी अचूक निशाणे साधले. अंकिताने 666 गुणांसह 11वे स्थान मिळवले. भजन कौर 659 गुणांसहा 22व्या आणि दीपिका कुमारी 658 गुणांसह 23व्या क्रमांकावर राहिल्या. अशाप्रकारे भारताच्या खात्यात एकूण 1983 गुण जमा झाले. कोरियाच्या महिला संघाने 2046, चीनने 1996 आणि मेक्सिकोच्या संघाने 1986 गुण मिळवून अनुक्रमे पहिले, दुसरे तिसरे स्थान मिळवले. (Paris Olympics 2024 Archery)

अंकिताची सर्वोत्तम कामगिरी

अंकिता भक्तने पहिल्या फेरीत भारतासाठी बुल्सआयवर निशाणा साधला. तर दुसऱ्या फेरीत तिने 12 पैकी तीनवेळा बुल्सआयचा वेध घेतला. दुसरीकडे दीपिकाची खराब सुरुवात झाली. तिला तिसऱ्या फेरीत बुल्सआयवर निशाणा साधण्यात यश आले.

कोरियाच्या सिहयोनचा विश्वविक्रम

कोरियाची तिरंदाज सिहयोन हिने 694 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर तिची साथीदार सुहयोन 688 गुणांसह द्वितीय स्थानी राहिली. चीनची जिओलेई यांगने 673 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. सिहयोने 694 गुण मिळवून विश्वविक्रम केला. यापूर्वी महिला पात्रता फेरीतील विक्रम 692 होता. (Paris Olympics 2024 Archery)

SCROLL FOR NEXT