paris olympic attack on train tracks
फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कवर हल्ला करण्यात आला आहे.  Twitter
स्पोर्ट्स

ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्समध्ये जाळपोळ! रेल्वे रुळांवर हल्ला, 8 लाख लोक स्टेशनवर अडकले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympic Train Attack : पॅरिस ऑलिम्पिक 2024 शुक्रवारपासून सुरू होत आहे. फ्रान्सच्या राजधानीत खेळाडू जमले असून सीन नदीवरील ऐतिहासिक ऑलिम्पिक सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान, फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कवर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे समोर आले आहे. पॅरिसच्या वेळेनुसार पहाटे 5:15 वाजल्यानंतर या घटना घडत गेल्या. यामुळे ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी पॅरिसमधील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवर हल्ला कोणी केला आणि का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी क्रीडा रसिकही पॅरिसमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. पण शुक्रवारी पहाटे फ्रान्सच्या हाय-स्पीड ट्रेन नेटवर्कला लक्ष्य करण्यात आले. विविध स्थानकांवर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यामुळे अनेक स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबवाव्या लागल्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय तर झालीच पण अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेची तारांबळ उडाली. ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी प्रवासात अडथळा आणण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.

फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनी एसएनसीएफने म्हटले आहे की हाय-स्पीड लाइन नेटवर्कमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला आहे. जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेला बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. फ्रान्सचे वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हर्जराइट यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हल्ल्याचा निषेध केला आहे. एसएनसीएफच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

वृत्तानुसार, हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. अनेक ट्रेन 90 मिनिटे उशिराने धावत आहेत. या हल्ल्यामुळे जवळपास 8 लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत. एसएनसीएफने सर्व प्रवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांना स्टेशनवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रेल्वे रुळांचे मोठे नुकसान

एसएनसीएफ प्रमुख म्हणाले की, रात्री आमचे रेल्वे नेटवर्क आणि वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॅरिसच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला चालणाऱ्या टीजीव्ही लाईन्सवर तीन ठिकाणी आगी लागल्या आहेत. ज्यात रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला आठवडाभराचा कालावधी लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ल्योन आणि दक्षिणेकडे भूमध्य समुद्राकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

रेमी ट्रेन सेंटर व्हॅल डी लोअर यांनी सांगितले की, उत्तर फ्रान्समधील कोर्लेन येथील ट्रॅकजवळ जाळपोळ केल्याने पॅरिसची रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. या मार्गावरील प्रवास किमान सोमवारपर्यंत विस्कळीत होईल. युनायटेड किंगडम आणि फ्रान्सला जोडणाऱ्या हाय-स्पीड ट्रेन सेवाही रद्द करून इतर मार्गाने वळवाव्या लागल्या आहेत. याचा पॅरिस आणि लिले दरम्यानच्या प्रवासावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याने प्रवास करावा लागत आहे.

फ्रान्समध्ये एकूण 4 प्रमुख हाय-स्पीड ट्रेन लाइन आहेत. ज्या संपूर्ण देशाला पॅरिसशी जोडतात. त्यापैकी 3 वर हल्ले झाले. तर 1 रेल्वे मार्गावरील हल्ला हाणून पाडण्यात आला. ज्या मार्गांवर हल्ला झाला त्यात अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न लाईन्सचा समावेश होता. पॅरिसपासून 160 किमी अंतरावर असलेल्या फ्रान्सच्या अरास शहरात हा हल्ला झाला. यानंतर, कोर्टलेन शहरातील टूर्स आणि ले मॅन्स लाइनवर दुसरा हल्ला झाला. हे शहर पॅरिसपासून 144 किमी अंतरावर आहे.

SCROLL FOR NEXT