कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तानची मधली फळी कमकुवत संघाने मधल्या षटकांमध्ये आपल्या फलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे असल्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान संघाला दिला आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी कशी राहील? अशी विचारणा केली असता आफ्रिदीने हे भाष्य केले आहे.
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या फलंदाजीवर बोट ठेवले आहे. आमच्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. विशेषत: मधल्या षटकांमध्ये त्यांची फलंदाजी संथ गतीने होते. 7 ते 13 या षटकांमध्ये पाकिस्तानी फलंदाजांनी त्यांचा स्ट्राईक रेट सुधारायला हवा. या षटकांमध्ये पाकिस्तानने साधारणपणे 8 ते 9 धावा प्रत्येक षटकात वसूल केल्या पाहिजेत. मात्र, असे असले तरी यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान हीच माझी फेव्हरेट टीम असेल, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे.
दरम्यान, शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तानसाठी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत बाबर आझम हाच हुकमाचा एक्का ठरणार आहे. संघातले सगळेच खेळाडू महत्त्वाचे आहेत; पण जर तुम्ही गेल्या काही काळातली कामगिरी पाहिली, तर बाबर आझमने मोठी भूमिका पार पाडणे आवश्यक आहे.