स्पोर्ट्स

NZ vs PAK : शेवटच्या टी-20 लढतीत पाकचा न्यूझीलंडवर विजय

Arun Patil

ख्राईस्टर्च, वृत्तसंस्था : फिरकीपटूंनी बजावलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या (NZ vs PAK) टी-20 मालिकेतील पाचवा सामना पाकिस्तानने रविवारी 42 धावांनी जिंकला. मालिकेतील पहिले चारही सामने न्यूझीलंडने आधीच जिंकल्यानंतर पाकला या विजयाने थोडाफार दिलासा मिळाला.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा फटकावल्या. मात्र, हे सोपे लक्ष्य न्यूझीलंडला पेलवले नाही. त्यांचा सगळा संघ उण्यापुर्‍या 92 धावांत गारद झाला. त्यांची सुरुवातच डळमळीत झाली. सलामीवीर रचिन रवींद्र केवळ एक धाव करून तंबूत परतला. दुसरा सलामीवीर फिन अ‍ॅलन याने 22, टीम सायफर्टने 19, तर विल यंगने 12 धावांचे योगदान दिले. 4 बाद 54 धावा झालेल्या असताना ग्लेन फिलिप्सने 26 धावांची चमकदार खेळी केली. मात्र, कर्णधार शाहिन आफ्रिदीने त्याला सापळ्यात अडकवले आणि न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फेरले गेले. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद याने 4 षटकांत अवघ्या 24 धावा देऊन तीन गडी टिपले. तो या सामन्याचा मानकरी ठरला. आफ्रिदी, मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी दोन, तर उसामा मीर व झमान खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. (NZ vs PAK)

त्यापूर्वी पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 38, तर फखर झमानने 33 धावांची खेळी केली. अन्य खेळाडूंपैकी कोणालाच फारशी चमक दाखवता आली नाही. येथील खेळपट्टी प्रामुख्याने गोलंदाजांना मदत करत असल्यामुळे धावांना आपोआपच लगाम लागत असल्याचे दिसून आले. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी दोन गडी तंबूत पाठवले. अशाप्रकारे न्यूझीलंडने ही मालिका 4-1 या फरकाने खिशात टाकली. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अ‍ॅलन मालिकावीर ठरला. त्याने पाच सामन्यांत 275 धावा झोडल्या.

SCROLL FOR NEXT