पल्लेकेले; वृत्तसंस्था : श्रीलंकेविरुद्ध अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीने लढवल्या गेलेल्या सामन्यात 5 धावांनी निसटता विजय मिळवल्यानंतरही पाकिस्तानचे टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. या निकालासह सुपर-8 फेरीतील ग्रुप- 2 मधून सरस नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
साहिबजादा फरहान (100) व फखर झमानच्या (84) झंझावाती फलंदाजीनंतर पाकिस्तानने 8 बाद 212 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला 147 किंवा त्यापेक्षा कमी धावात रोखणे अनिवार्य होते. तसे झाले असते तरच त्यांना न्यूझीलंडचा नेट रनरेट ओलांडता आला असता. मात्र, श्रीलंकेने ही धावसंख्या तर सहज पार केलीच. शिवाय, विजय मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न केले. अंतिम क्षणी त्यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला असला तरी लंकेने पाकचे उपांत्य फेरी गाठण्याचे मनसुबे मात्र यामुळे पार धुळीस मिळवले.
सलामीवीर साहिबजादा फरहानचे स्पर्धेतील दुसरे शतक आणि फखर झमानच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 212 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी शनिवारी या निर्णायक लढतीत श्रीलंकन गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. फरहान आणि फखर या जोडीने पहिल्या विकेटसाठी 176 धावांची विक्रमी भागीदारी रचली. फरहानने यादरम्यान एकाच टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. कोहलीने 2014 मध्ये 319 धावा फटकावल्या होत्या. यंदा फरहानने 383 धावा लुटल्या.
शेवटच्या षटकात काय घडले?
डावखुरा स्पीडस्टार शाहिन शाह आफ्रिदीच्या डावातील शेवटच्या षटकात विजयासाठी 28 धावांची आवश्यकता असताना दासून शनाकाने तब्बल 22 धावा फटक ावत एकच खळबळ उडवून दिली. मात्र, शेवटच्या दोन चेंडूंत 6 धावा जमवता न आल्याने त्याच्यासह लंकेचीही निराशा झाली. शनाकाने या षटकात खेचलेले एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर लेग, कव्हर्सकडील 3 षटकार व मिसहिटचा एक चौकार लक्षवेधी ठरले.