पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ नोव्हेंबर महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ ठरला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत त्याने भारताच्या जसप्रीत बुमराह आणि द. आफ्रिकेच्या मार्को जॅनसेन यांना मागे टाकून बाजी मारली. पाकिस्तानचा हा सलग दुसरा पुरस्कार आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यासाठी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अलीने हा पुरस्कार जिंकला होता.
ICC दर महिन्याला प्लेयर ऑफ द मंथसाठी तीन खेळाडूंना नामांकित करते. नोव्हेंबर महिन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, हारिस रौफ आणि मार्को जॅनसेन यांचा समावेश होता. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या. तर रौफने ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या 9 सामन्यात 18 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला 2002 नंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडे मालिका जिंकली होती.
महिला गटातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार इंग्लंडच्या फलंदाज डॅनी व्याट हिला मिळाला. तिने बांगलादेशच्या शर्मीन अख्तर आणि दक्षिण आफ्रिकेच्या नादिन डी क्लर्कला मागे टाकून हा आयसीसी पुरस्कार आपल्या नाववर केला. डॅनीच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने द. आफ्रिकेला टी-20 मालिकेत 3-0ने क्लिन स्विप दिला होता.