स्पोर्ट्स

Pakistan Boycott India Match : पाकिस्तानला दणका! बहिष्कार टाकाल, तर प्रसारणकर्ते कोर्टात खेचणार

T‌20 World Cup 2026 : ‘आयसीसी‌’चा पाकला गर्भित इशारा

रणजित गायकवाड

दुबई : आगामी 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) महागात पडण्याची शŠयता आहे. पाकिस्तानने हा सामना न खेळल्यास अधिकृत प्रसारणकर्ते ‌‘जिओ-स्टार‌’ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिला आहे.

पाकिस्तान सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार ‌‘पीसीबी‌’ने या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचे अधिकृत कारण अद्याप ‌‘आयसीसी‌’ला कळवण्यात आलेले नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, ‌‘आयसीसी‌’ पाकिस्तानचा वार्षिक महसुलातील 35 दशलक्ष डॉलरचा (सुमारे 300 कोटी रुपये) हिस्सा रोखून धरू शकते. हाच पैसा प्रसारणकर्त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वापरला जाण्याची शŠयता सूत्रांनी वर्तवली आहे.

‌‘पीसीबी‌’च्या अडचणीत वाढ

‌‘पीसीबी‌’चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी यासंदर्भात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली असली, तरी बोर्डाच्या कायदेशीर तज्ज्ञांनी गंभीर परिणामांची भीती व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने आपली भूमिका बदलली नाही, तर केवळ आर्थिक दंडच नाही, तर कायदेशीर खटल्यालाही सामोरे जावे लागेल. विशेष म्हणजे, याप्रकरणी ‌‘आयसीसी‌’च्या ‌‘विवाद निवारण समिती‌’कडे दाद मागण्याचे सर्व मार्गही बंद होतील, असे सूत्रांनी सांगितले.

अंतिम टप्प्यात मोहसीन नक्वी ‌‘यू-टर्न‌’ घेणार?

मोहसीन नक्वी हे क्रिकेट प्रशासकासोबतच राजकारणीदेखील आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आपली भूमिका बदलू शकतो, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. अंतिम क्षणी नक्वी रणनीती बदलतात का, याची यावेळी उत्सुकता असेल. असे झाले नाही तर मात्र जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान एकाकी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुटप्पी भूमिकेचा फटका

भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला असला, तरी त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास कधीही नकार दिलेला नाही. याउलट, श्रीलंकेसारख्या त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास संमती देऊनही पाकिस्तानने माघार घेतल्याने त्यांच्या विरोधात कडक पाऊल उचलले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT