स्पोर्ट्स

पाकिस्तानचा कामचुकारपणा उघड! निकृष्ट मैदानामुळे न्यूझीलंडचा क्रिकेटर जखमी (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. 8) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. पाकच्या डावाच्या 38 व्या षटकात रवींद्र झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना फ्लडलाइट्सच्या कमी प्रकाशामुळे त्याला चेंडू नीट दिसला नाही आणि तो थेट कपाळावर आदळला. घटनेनंतर रवींद्र जमिनीवर पडला आणि त्याच्या कपाळातून रक्त येऊ लागले.

न्यूझीलंडच्या वैद्यकीय पथकाने त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेले आणि त्याच्यावर उपचार केले. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (एनझेडसी) एक निवेदन जारी केले आहे की रवींद्रच्या कपाळावर जखम आहे पण तो ठीक आहे. त्याचे पहिले हेड इम्पॅक्ट असेसमेंट (HIA) पूर्ण झाले आहे. तो वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे.

पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात फलंदाज खुसदिलने डीप स्क्वेअर लेगकडे जोराचा फटका मारला. चेंडू उंच उडाला. सीमारेषेजवळ रचिन रवींद्र उभा होता. तो झेल घेण्यास सरसावला. पण फ्लडलाइट्सच्या कमी प्रकाशामुळे त्याला चेंडू नीट दिसला नाही आणि तो थेट कपाळावर आदळला. जखमी झाल्यानंतर, रचिन तिथेच जमिनीवर पडला. त्यानंतर किवी संघाच्य फिजिओ पथकाने मैदानावर धाव घेतली. रचिनवर प्रथम मैदानावरच उपचार करण्यात आले, त्यानंतर त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले.

चाहत्यांनी पीसीबीला केले लक्ष्य

चाहते सोशल मीडियावर पीसीबीवर प्रतिक्रिया देत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की रचिन रवींद्रला फ्लडलाइट्समुळे दुखापत झाली. चाहते सोशल मीडियावर याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. त्यांनी पीसीबीला फ्लडलाइट्सची गुणवत्ता सुधारण्याबाबत फटकारले आहे.

पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याच्या एक दिवस आधीच गद्दाफी स्टेडियम खुले करण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या स्टेडियमची नव्याने बांधणी करण्यात आली आहे, पण घाईगडबडीत स्टेडियममधील यंत्रसामग्रीची चाचणीही घेण्यात आली नाही. निकृष्ट कामाकडे डोळेझाक करण्यात आली. स्टेडियमची उभारणी एकदम भारी केल्याचा गवगवा पाकिस्तान बोर्डाने केला. याचाच फटका न्यूझीलंडच्या क्रिकेटरला बसला. ज्यामुळे खेळाडूंमध्ये भीती निर्माण झाली.

शनिवारी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील त्रिकोणी मालिकेला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर 78 धावांनी पराभूत केले. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्लेन फिलिप्स (106) आणि डॅरिल मिशेल (81) यांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने 50 षटकांत 6 बाद 330 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा डाव 47.5 षटकांत 252 धावांवर आटोपला आणि त्यांना 78 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात रचिन रवींद्रने 19 चेंडूत जलद 25 धावा केल्या पण नंतर अबरार अहमदने त्याला झेलबाद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT