Sourav Ganguly on cricket with Pakistan after Pahalgam attack
कोलकाता: काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी पाकिस्तानबाबत कठोर संदेश दिला आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांबाबत विचारले असता, भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) माजी अध्यक्ष गांगुली म्हणाले की, भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध तोडावेत आणि ICC तसेच आशियाई स्पर्धांमध्येही पाकिस्तानविरुद्ध खेळू नये.
गांगुली म्हणाले की, दर काही वर्षांनी भारतात दहशतवादी हल्ले होत आहेत आणि आता हे सहन करणे योग्य नाही. भारताने अगदी 100 टक्के पाकिस्तानसोबतचे क्रिकेटचे संबंध तोडावेत.
हे करायलाच हवे. कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. दरवर्षी अशा घटना घडत आहेत, हा जणू आता विनोदच झाला आहे. दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही.
दरम्यान, तत्पूर्वी स्पोर्ट्स टुडे या कार्यक्रमात BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीदेखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. शुक्ला यांनी स्पष्ट केले की भारत सरकारच्या धोरणामुळे भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळत नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही भारत पाकिस्तानला खेळण्यासाठी गेला नव्हता. भारताने सर्व सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरच खेळले.
"आम्ही हल्ल्यातील पीडितांच्या सोबत आहोत आणि आम्ही या घटनेचा निषेध करतो. आमचे सरकार जे म्हणेल, आम्ही त्यानुसार कृती करू. आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सामने खेळत नाही आणि भविष्यातही खेळणार नाही.
मात्र ICC स्पर्धांमध्ये ICC च्या धोरणामुळे सामना खेळावा लागतो. ICC ला ही परिस्थिती माहीत आहे," असे शुक्ला यांनी सांगितले.
22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरणमध्ये 5 ते 6 दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात 26 जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले.