हैदराबाद : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केल्याचा प्रचंड आनंद आहे. मात्र, सोशल मीडियावर भारताच्या या विजयासाठी वापरल्या जाणार्या ‘ऑपरेशन तिलक’ या टॅगलाईनला माझा आक्षेप आहे. याऐवजी या विजयाला ‘ऑपरेशन सिंदूर’, असे म्हणा. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या विजयाचे वर्णन क्रीडा क्षेत्रातील ‘ऑपरेशन सिंदूर’ असेच केले आहे, असे प्रतिपादन तिलक वर्माने केले. आशिया चषकातील जेतेपदावर शिक्कामोर्तब करून हैदराबादेत पोहोचल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
रविवारी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 147 धावांचा पाठलाग करत दणदणीत विजय मिळवला. या विजयात 22 वर्षीय तिलक वर्माने नाबाद 69 धावांची खेळी करत मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ‘ऑपरेशन तिलक’ हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड झाला होता.
मे महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सीमेवर निर्माण झालेल्या तणावानंतर भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर आमने-सामने आले होते. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली होती. या पार्श्वभूमीमुळे दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक तणाव होता.