operation sindoor effect ipl 2025 mumbai indians vs punjab kings match
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. दोन्ही संघांमधील सामना 11मे रोजी धर्मशाळा येथे होणार होता परंतु भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर धर्मशाळा विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले, ज्यामुळे बीसीसीआयला शेवटच्या क्षणी सामन्याचे ठिकाण बदलावे लागले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल भारतात सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बदल केले जात असले तरी, इंडियन प्रीमियर लीगचे सामने पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत, पण यातील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना धर्मशाला येथून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे हलवण्यात आला आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी याची पुष्टी केली. मुंबई आणि पंजाब यांच्यातील हा सामना दुपारी सुरू होईल. पटेल म्हणाले, ‘बीसीसीआयने आम्हाला विनंती केली होती आणि आम्ही ती स्वीकारली आहे. मुंबई संघ गुरुवारी (दि. 8) संध्याकाळी येथे पोहोचत आहे. पंजाबचा संघ कधी येईल याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. हा संघ लवकरच अहमदाबादमध्ये येईल.’
धर्मशाळा येथे गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. यानंतर, 11 मे रोजी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे याच मैदानावर करण्यात आले होते. पण भारताने पाकिस्तान विरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर धर्मशाळा, जम्मू आणि चंदीगडसह अनेक विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघ धर्मशाला येथे पोहचू शकणार नाही. पण दिल्ली आणि पंजाब हे संघ सध्या धर्मशाला येथे असल्याने हा सामना नियोजित वेळेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.