पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकून देणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल सुरेश कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारने गुरुवारी (दि. 2) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे स्वप्निल कुसाळेच्या प्रशिक्षिका दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकले. त्याच्या या कामगिरीने महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे स्वप्न साकार झाले. त्याच बरोबर पॅरा ऑलिम्पिकमध्ये सांगलीच्या सचिन सर्जेराव खिल्लारी यांनी चमकदार कामगिरी करत गोळाफेकीच्या एफ 46 प्रकारात रौप्य पदक पटकावले होते. महाराष्ट्राच्या या दोन्ही सुपुत्रांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूला बक्षीस स्वरुपात पंधरा लाख रुपये मिळतात.
स्वप्निल हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (तालुका-राधानगरी) येथील आहे. वडील शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. इयत्ता नववीत शिकताना नेमबाजीत राज्य पातळीवरील पहिले सुवर्णपदक जिंकले. तेव्हाच ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे स्वप्न पाहिलेला स्वप्निल पॅरिस ऑलिंपिक मध्ये निश्चितपणे पदक मिळवून देशाचे नाव उज्वल केले. मध्यमवर्गीय कुटुंबांतील या तरुणाने ऑलिम्पिकपर्यंत झेप मारत केलेली पदकाची कमाई निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्निलच्या रुपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधव यांच्यानंतर दुसरे ऑलिम्पिक पदक मिळाले. तो सध्या रेल्वेत नोकरीला आहे.