नवी दिल्ली : २०२७ वन-डे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया एकाच गटात आले असून, जाहीर रूपरेषेनुसार भारत-पाकिस्तान लढत १० ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. याशिवाय, भारत-ऑस्ट्रेलिया लढत ७ ऑक्टोबरला केपटाऊन येथे होईल. २०२३ च्या वर्ल्डकप फायनलची ती पुनरावृत्ती असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी या पुढील वर्षी रंगणार्या वर्ल्डकपची रूपरेषा जाहीर केली. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेचा प्रारंभ २ ऑक्टोबर रोजी होईल, तर अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामना स्पर्धेतील सर्वात मोठे मैदान असलेल्या ‘वांडरर्स स्टेडियम’वर रंगणार असून, या हायव्होल्टेज सामन्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी असणे साहजिकच आहे. स्पर्धेच्या प्रारंभी तळातील तीन पैकी दोन संघांना बाहेर काढण्यासाठी एक प्राथमिक फेरी खेळवली जाईल. त्यानंतर उर्वरित १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करून साखळी सामने होतील.
दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ आणि चौथ्या स्थानावरील सर्वोत्तम एका संघासह एकूण सात संघ ‘सुपर सेव्हन’ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीत विजेतेपदाचा फैसला होईल. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे, डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या तीन वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेनंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसत आहेत.
विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड एकतर्फी राहिला आहे. वन-डे विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्धचे सर्व आठही सामने जिंकले आहेत, तर टी-२० विश्वचषकात नऊ पैकी आठ सामन्यांत विजय मिळवला आहे; तरीही या दोन संघांमधील चुरस अत्यंत तीव्र स्वरूपाची राहत आली आहे. दरम्यान, ‘अ’ गटामध्ये भारतासोबत अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पात्रता फेरीतून पुढे येणाऱ्या एका संघाचाही समावेश असणार आहे.
२०२७ वन-डे विश्वचषक स्पर्धा
कालावधी : २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
सहभागी संघ : १४
अ गट : अफगाण, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, क्वॉलिफायर-१
ब गट : बांगला देश, इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, क्वॉलिफायर-२
साखळी फेरी : ७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर
सुपर ७ फेरी : २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर
पहिली उपांत्य लढत : १७ नोव्हेंबर (केपटाऊन )
दुसरी उपांत्य लढत : १८ नोव्हेंबर (त्स्वाने)
अंतिम लढत : २१ नोव्हेंबर (जोहान्सबर्ग)