NZ vs IND Arshdeep Singh: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १८५ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडचे ४ फलंदाज बाद केले. त्याने एक खास विक्रम देखील केला आहे. तर गुरूनूर ब्रार या युवा खेळाडूने देखील चांगला मारा करत ३ विकेट्स घेतल्या. या दोघांना अन्शुल कुंभोजने २ विकेट्स घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून फक्त ५ फलंदाजांचा दुहेरी आकडा पार करता आला असून किवींकडून टीम सैफेटने सर्वाधिक ३८ धावा केल्या.
सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेक भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवत न्यूझीलंडचा निम्मा संघ ९७ धावात गार केला. अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार या वेगवान जोडीने न्यूझीलंडची टॉप ऑर्डर उडवली. यानंतर अन्शुल कांभोजने पार्टी जॉईन करत न्यूझीलंडच्या मधल्या फळीला धक्के दिले. एक वेळ अशी होती की न्यूझीलंडची अवस्था ९ बाद १४६ धावा झाली होती.
मात्र त्यानंतर शेवटच्या जोडी टिकनेर अन् डफी यांनी झुंजार खेळ करत संघाचं नाक वाचवलं. त्यांनी संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र ब्रारने २३ चेंडूत ३४ धावा करणाऱ्या टिकनेरला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.
विशेष म्हणजे अर्शदीप सिंगने ७० धावा देत ४ विकेट्स घेत एक खास विक्रम देखील आपल्या नावावर केला. न्यूझीलंडमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
अर्शदीपचा खास विक्रम
यापूर्वी जवागल श्रीनाथने २००३ मध्ये २३ धावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. १९९५ मध्ये श्रीनाथनेच ५२ धावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. २०१४ च्या दौऱ्यात मोहम्मद शमीने ५५ धावात ४ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली होती. आता या पंक्तीत अर्शदीप सिंग जाऊन बसला असून त्याने ऑकलंडमधील सामन्यात ७० धावात ४ विकेट्स घेतल्या आहेत.
जवागल श्रीनाथ (२००३) - २३ धावात ४ विकेट्स
जवागल श्रीनाथ (१९९५) - ५२ धावात ४ विकेट्स
मोहम्मद शमी (२०१४) - ५५ धावात ४ विकेट्स
अर्शदीप सिंग (२०२६) - ७० धावात ४ विकेट्स