माऊंट मौंगानुई (न्यूझीलंड) : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने आपले पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसर्या सामन्यात न्यूझीलंडवर तीन गडी राखून विजय मिळवत चॅपेल-हॅडली मालिका 2-0 अशी जिंकली. 50 चेंडूंत शतक पूर्ण करणार्या मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांभाळले.
मधल्या षटकांमध्ये संघाने एकापाठोपाठ विकेट गमावल्यानंतरही मार्शने संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने दिलेले 157 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दोन षटके बाकी असताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावा करून पूर्ण केले. मार्श 103 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या एकूण धावसंख्येपैकी 60 टक्क्यांहून अधिक धावा त्याने एकट्याने केल्या. बुधवारच्या पहिल्या सामन्यातही मार्शने 43 चेंडूंत 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. शुक्रवारचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. दरम्यान, या तिसर्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत 9 बाद 156 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर टिम सायफर्टने सर्वाधिक 35 चेंडूंत 48 धावा केल्या.