मँचेस्टर; वृत्तसंस्था : फुटबॉलच्या मैदानावर डिफेंडर्सना वाऱ्याच्या वेगाने चकवणारा आणि गोलचे डोंगर उभे करणारा नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालँड सध्या त्याच्या खेळासोबतच एका अजब कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे एकूण दिसणे आणि त्याची चपळता पाहता तो माणूस नसून कोणी ‘सायबॉर्ग’ (रोबोट) आहे की काय, अशी शंका फॅन्सना नेहमीच येते. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या या अद्भुत आणि अमानवी ताकदीचे खरे रहस्य त्याच्या ‘वायकिंग’ स्टाईल डाएट प्लॅनमध्ये दडलेले आहे. डाएट तज्ज्ञांना थक्क करणारा हालँड रोज तब्बल ६,००० कॅलरीजचे अन्न फस्त करतो, जे एका सामान्य माणसाच्या गरजेपेक्षा तिप्पट आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिथे आधुनिक खेळाडू फॅट वाढू नये म्हणून उकडलेले चिकन आणि पास्ता खातात, तिथे हालँडच्या आहारात प्रामुख्याने प्राण्याचे हृदय आणि लिव्हर यांसारख्या ऑर्गन मीटचा समावेश असतो. या डाएटने फुटबॉल विश्वात खळबळ उडवून दिली आहे. आपल्या या सवयीबद्दल बोलताना हालँड म्हणाला, ‘लोकांना वाटतं मांस खाणं वाईट आहे, पण स्थानिक शेतात शुद्ध गवत खाऊन वाढलेल्या प्राण्यांचे अवयव-मांस शरीराला लोखंडासारखी ताकद आणि भरपूर आयर्न देते. मी पॅकेट फूड आणि साखर पूर्णपणे टाळतो.’
याशिवाय, तो चहा किंवा कॉफीऐवजी थेट फार्मवरून आणलेले कच्चे दूध आणि त्यात स्थानिक मध टाकून पिणे पसंत करतो, याला तो आपले ‘जादुई पेय’ मानतो. केवळ आहारच नाही, तर शरीराची रिकव्हरी करण्यासाठी हालँड काही अजब नियमांचे काटेकोरपणे पालन करतो :
बायोलॉजिकल क्लॉक : सकाळी उठल्या उठल्या तो डोळ्यांवर कोवळे ऊन घेतो, यामुळे त्याची झोप सुधारते. ब्लू-लाईट चष्मा : रात्री स्क्रीनच्या घातक प्रकाशापासून वाचण्यासाठी तो विशेष चष्मा वापरतो. खास पाणी : तो फक्त अत्यंत प्रगत पद्धतीने फिल्टर केलेले पाणीच पितो. तथापि, या कडक डाएटमध्येही एक रंजक वळण आहे. इतका शिस्तप्रिय असलेला हालँड वर्षातून कधीतरी सुट्टीच्या दिवशी आपल्या गावी गेल्यावर ‘कबाब पिझ्झा’ आणि भारतीय ‘बटर चिकन-गार्लिक नान’वर मनसोक्त ताव मारतो. मैदानावर सुसाट धावणाऱ्या या आधुनिक ‘वायकिंग’ची ही रंजक खाद्यसंस्कृती सध्या जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहलाचा विषय बनली आहे.