नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमबाजीत मोना अगरवाल हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर, लांब उडी (लाँग जम्प) प्रकारात निषाद कुमार याने देशाच्या खात्यात दुसऱ्या सुवर्णपदकाची भर घातली. निषादने 'टी-४५' (T45) वर्गवारीत अप्रतिम कामगिरी करत ही सुवर्णझेप घेतली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने २ सुवर्ण, २ रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण ५ पदकांची कमाई करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे.
लांब उडीच्या चुरशीच्या अंतिम फेरीत निषाद कुमार याने ७.११ मीटर लांब उडी मारून सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे, निषादची खरी ओळख ही प्रामुख्याने उंच उडी (हाय जम्प) या क्रीडा प्रकारातील खेळाडू म्हणून आहे. उंच उडीमध्ये त्याने यापूर्वी पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला दोन पदके जिंकून दिली आहेत. मात्र, या वेळी लांब उडीसारख्या वेगळ्या प्रकारात उतरून त्याने नवा इतिहास घडवत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.
मूळचा हिमाचल प्रदेशचा रहिवासी असलेल्या निषाद कुमारचा जन्म ३ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला. यापूर्वी तो प्रामुख्याने 'टी-४७' (T47) या वर्गवारीत सहभागी व्हायचा, ज्यामध्ये हात किंवा पायात शारीरिक अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंचा समावेश होतो. टोकियो आणि पॅरिस या दोन्ही पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने उंच उडी प्रकारात चमकदार कामगिरी करत पदके जिंकली होती.
निषादच्या या यशामागे प्रचंड संघर्षाची आणि जिद्दीची पार्श्वभूमी आहे. लहानपणी शेतात आई-वडिलांना कामात मदत करत असताना, गवत कापण्याच्या यंत्रात (फॉडर कटर) त्याचा उजवा हात अडकला आणि या भीषण अपघातात त्याला आपला हात गमवावा लागला. या आघातानंतरही निषादने खचून न जाता आपल्या आईकडून प्रेरणा घेतली आणि खेळाच्या मैदानात नशीब आजमावण्याचा निर्धार केला.
प्रारंभी त्याने राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली. त्यानंतर २००९ मध्ये त्याने हाय जम्पकडे आपला मोर्चा वळवला. एका हाताचे संतुलन सांभाळण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्ती कमावण्यासाठी तो दररोज एकाच हाताने सायकलिंगचा कठोर सराव करत असे.
त्याच्या या अखंड मेहनतीचे फळ आज आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर दिसून येत आहे. टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधील यशाची परंपरा कायम राखत, निषादने आयची-नागोया आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुन्हा एकदा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.