Nicholas Pooran T20 Century Pudhari
स्पोर्ट्स

Fastest T20 Century: 13 षटकार आणि 5 चौकार; 321च्या स्ट्राईक रेटने 31 चेंडूत ठोकलं शतक, क्रिस गेलचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Nicholas Pooran Century: एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरन याने मेजर लीग क्रिकेट 2026 मध्ये अवघ्या 31 चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला.

पुढारी वृत्तसेवा

Nicholas Pooran Century: मेजर लीग क्रिकेट (MLC) 2026 स्पर्धेत एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरन याने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करत अवघ्या 31 चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याच्या या विस्फोटक खेळीमुळे टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली. मात्र, आयपीएलमध्ये ख्रिस गेलने केलेल्या 30 चेंडूंतील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम एका चेंडूने मागे राहिला.

वॉशिंग्टन फ्रीडमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमआय न्यूयॉर्ककडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पूरनने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत विरोधी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

पूरनने केवळ 33 चेंडूंमध्ये 106 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने 13 षटकार आणि 5 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 321.21 इतका होता. अवघ्या 31 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत त्याने मेजर लीग क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.

फ्रँचायझी टी-20 क्रिकेटमध्ये मात्र ख्रिस गेलच्या 30 चेंडूंतील शतकानंतर पूरनची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान शतकी खेळी ठरली. पूरनला अनुभवी अष्टपैलू किरॉन पोलार्ड याचीही उत्तम साथ मिळाली.

पोलार्डने केवळ 25 चेंडूंमध्ये 64 धावा करत एक चौकार आणि आठ षटकारांची आतषबाजी केली. त्याचा स्ट्राइक रेट 256 इतका होता. या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर एमआय न्यूयॉर्कने 20 षटकांत 9 बाद 266 धावा उभारल्या आणि वॉशिंग्टन फ्रीडमसमोर विजयासाठी 267 धावांचे आव्हान ठेवले.

निकोलस पूरनची कारकीर्द

2 ऑक्टोबर 1995 रोजी जन्मलेला निकोलस पूरन हा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळत आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पूरनने वेस्ट इंडिजसाठी 106 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2,275 धावा केल्या असून त्यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 98 आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 61 सामन्यांत 1,983 धावा करत 3 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 आहे. मेजर लीग क्रिकेटमधील या तुफानी शतकी खेळीमुळे निकोलस पूरन पुन्हा एकदा जगभरातील क्रिकेटप्रेमींचा चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT