स्पोर्ट्स

निकोलस पूरन.. व्यूहरचना आणि वेगवान बॅट स्विंगचा अनोखा संगम

Nicholas Pooran : वेसण घालण्यात सर्व गोलंदाज अपयशी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : निकोलस पूरनची टी-20 मधील फलंदाजी म्हणजे व्यूहरचना, स्नायूंची ताकद आणि वेगवान बॅट स्विंग यांचा अनोखा संगम आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात, तो प्रति सामन्यात सरासरी पाच षटकार मारत आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीतही त्याने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या 15 फलंदाजांमध्ये तो एकमेव खेळाडू आहे ज्याने चौकारांपेक्षा (25 चौकार) जास्त षटकार (31) मारले आहेत. त्याच्याकडून होणारी षटकारांची आतषबाजी पाहणे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. खेळातील हे सर्वाधिक धोकादायक कौशल्य त्याने अनेक वर्षांच्या मेहनतीने साध्य केले आहे.

पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला तेव्हा पूरन फक्त आठ वर्षांचा होता. त्यानंतर 2008मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे यशस्वी आयोजन तेव्हा तो 12 वर्षांचा झाला. पूरनचा क्रिकेटच्या मैदानातील प्रवेश आणि त्यानंतरची त्याची वाढ ही या टी-20 फॉरमॅटच्या उत्क्रांतीसोबतच झाली आहे. 2019 पासून तो आयपीएलच्या परिसंस्थेचा भाग बनला, मात्र, त्याच्या क्षमतेची खरी खोली 18व्या हंगामातच उघड झाली आहे.

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी एलएसजीने एक हुशारी केली. त्यांनी पूरनला रिटेन केली. यासाठी फ्रॅचायझीने 21 कोटी रुपये मोजले. तसेच एडन मार्कराम आणि मिचेल मार्श या दोन राईट हॅड सलामी फलंदाजांनंतरचे तिसरे स्थान कॅरेबियन खेळाडूसाठी पक्के करण्यात आले.

एलएसजीने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यातील दोन सामन्यात पॉवरप्लेनंतर पूरनला मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे. तर एकदा डावाच्या दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला तो खेळायला आला, जिथे त्याने शेवटपर्यंत फलंदाजी केली. तो केकेआरविरुद्धचा सामना होता. ज्यात त्याने 36 चेंडूत नाबाद 87 धावांची सर्वोत्तम साकारली. त्याला क्रीजवर वेळ मिळणे हे संघासाठी फायदेशीर ठरले आहे. ज्यामुळे त्याला अनेक महत्त्वपूर्ण सामने जिंकून देण्यात मोलाचे योगदान देता आले आहे.

या हंगामात पूरनला मधल्या षटकांमध्ये वेसण घालण्यात सर्व गोलंदाज अपयशी ठरले आहेत. त्याने या हंगामात एकूण 31 पैकी तब्बल 22 षटकार हे फिरकी गोलंदाजांविरुद्ध ठोकले आहेत.

याचा अर्थ असा नाही की जलद गोलंदाजांना पूरनवर वर्चस्व गाजवता आले आहे. याबाबतील आकडे तितके प्रभावी नसले तरीही ते गोलंदाजांच्या विरोधातच झुकलेले आहेत. तो फिरकीचा सामना आक्रमकपणे करतो. शिवाय त्याने वेगवान गोलंदाजीवरही तितक्याच आत्मविश्वासाने फटकेबाजी करण्याची कला अवगत केली आहे.

2024च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत निकोलस पूरनने सर्व टी-20 सामन्यांमध्ये एकूण 218 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणा-या द. आफ्रिकेच्या क्लासेनपेक्षा तो तब्बल 94 षटकारांनी पुढे आहे. या कालावधीत त्याने आयपीएल 2024 मध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्या हंगामात त्याने 14 सामन्यांत 35 षटकार मारले होते. तर एकूण स्पर्धेत 499 धावा फटकावल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 178.21 राहिला. मागील हंगामातील धावसंख्येला मागे टाकण्यासाठी त्याला केवळ 150 धावांची गरज आहे. त्याला अजून आठ सामने अजून खेळायचे आहेत.

पूरन पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले. या कालावधीदरम्यान त्याला अनेकदा वापर न झालेली महागडी वस्तू असे हिणवण्यात आले. पण LSGने 2024च्या मेगा लिलावाच्या टेबलावर आणि त्यानंतर मैदानावर योग्य समीकरणांची जुळवाजुळवी केली आणि पूरनचा आतापर्यंतचा सर्वात धडाकेबाज अवतार सादर करण्यात त्यांनी यश मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT