कोलंबो; वृत्तसंस्था : सँटेनर-कोलची 7 व्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी व रचिन रवींद्रच्या (4/27) कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेचा 61 धावांनी धुव्वा उडवला. याचबरोबर सहयजमान लंकेचे आव्हान संपुष्टात आले. या लढतीत न्यूझीलंडची एकवेळ 5 बाद 84 अशी दाणादाण उडाली होती. पण, सँटेनर-कोलच्या 84 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने 7 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेला 20 षटकांत 8 बाद 107 धावांवर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडने आपल्या शेवटच्या 4 षटकांत 70 धावा चोपल्या, ते या लढतीचे ठळक वैशिष्ट्य ठरले.
विजयासाठी 169 धावांचे आव्हान असताना लंकेच्या केवळ चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. कमिंदू मेंडिसने सर्वाधिक 31 तर दुनिथने 29 धावा केल्या. अन्य फलंदाज मात्र शरणागती पत्करत गेले आणि 20 षटकांत केवळ 8 बाद 107 धावा करता आल्याने अंतिमत: लंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. किवीज संघातर्फे रचिन रवींद्रने 27 धावांत 4 बळी घेतले. या विजयासह न्यूझीलंडसाठी उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
प्रारंभी, मिशेल सँटेनर व कोल मॅककॉन्की यांनी सातव्या गड्यासाठी 84 धावांची दणकेबाज भागीदारी साकारल्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकांत 7 बाद 168 धावांपर्यंत मजल मारली. टी-20 विश्वचषकातील या चुरशीच्या लढतीत मधल्या फळीतील फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे किवीज संघ एकवेळ 6 बाद 84 असा अडचणीत सापडला होता. मात्र, त्यानंतर कर्णधार मिचेल सँटेनर आणि कोल मॅककॉन्की यांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली.
बुधवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 2 बाद 75 अशी भक्कम होती. मात्र, श्रीलंकेच्या प्रभावी मार्यासमोर अचानक किवींच्या फलंदाजीला भगदाड पडले आणि अवघ्या 9 धावांत 4 गडी गमावून हा संघ 6 बाद 84 असा अडचणीत सापडला होता. श्रीलंकेच्या महेश तीक्षणाने 30 धावांत 3 बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले.