पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान संघासाठी न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात खूपच खराब झाली. दोन्ही संघांमधील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानी संघाची अवस्था वाईट झाली. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही, तर गोलंदाजही आपली छाप सोडू शकले नाहीत. ज्यामुळे पाकिस्तान संघाचा लाजिरवाणा पराभव झाला.
या सामन्यात किवी संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यानंतर यजमान संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तान फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. पाकचा संघ 18.4 षटकांत 91 धावांवर गारद झाला. पाकिस्तानला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने 59 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि 9 विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह यजमान न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना 18 मार्च रोजी ड्युनेडिनमधील युनिव्हर्सिटी ओव्हल येथे खेळला जाईल.