पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट संघाची पराभवाची मालिका आजही कायम राहिली. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाने तिरंगी एकदिवसीय मालिकेत दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले होते. यानंतर, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यातही पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. आता पाकिस्तान संघाने टी-२० मालिकेतील दुसरा सामनाही गमावला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात टिम सेफर्ट सामनावीर ठरला. (New Zealand vs Pakistan, 2nd T20I)
ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे १५ षटकांचाच झाला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघाने ९ गडी गमावात १३५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार सलमान अली आघा याने २८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. तर उपकर्णधार शादाब खानने १४ चेंडूत २६ धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने १४ चेंडूत २२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून जेकब डफी, बेन सीयर्स, जेम्स नीशम आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
न्यूझीलंडने १३६ धावांचे लक्ष्य अवघ्या १३.१ षटकात पूर्ण केले. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाला पहिल्या षटकात एकही धाव मिळाली नव्हती. तरीही संघाने १३.१ षटकात ५ गडी गमावून सामना जिंकला. न्यूझीलंडकडून टिम सेफर्टने २२ चेंडूत ४५ धावा केल्या. फिन ऍलनने १६ चेंडूत ३८ धावा केल्या. मिचेल हेने १६ चेंडूत २१ धावा केल्या. हरिस रौफने दोन, तर मोहम्मद अली, खुसदिल शाह आणि जहानाद खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मालिकेतील तिसरा सामना शुक्रवार २१ मार्च रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाईल. या मालिकेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकावा लागले. हा सामना जिंकला तर यजमान न्यूझीलंड मालिका जिंकेल.