नेपियर : एका अत्यंत चुरशीच्या आणि पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात न्यूझीलंडने कर्णधार मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) वादळी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजला पाच गडी राखून मात दिली. या विजयासह यजमान किवी संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आणि मालिकाही खिशात टाकली. एका क्षणाला वेस्ट इंडीजचा विजय निश्चित वाटत असताना सँटनरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने कॅरेबियन संघाच्या तोंडचा घास हिरावून घेतला.
या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना प्रत्येकी ३४-३४ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने अनुभवी यष्टिरक्षक शाय होप (Shai Hope) याच्या अप्रतिम शतकाच्या बळावर ९ गडी गमावून २४७ धावांचे एक मोठे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले.
एका वेळी विंडीज संघाची अवस्था बिकट झाली होती. संघाने ५ विकेट्स केवळ ८६ धावांवर गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर होप क्रीझवर तळ ठोकून राहिला. त्याने अवघ्या ६९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने १०९ धावांची नाबाद खेळी साकारली. ज्यामुळे संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. जस्टिन ग्रीव्ह्स (२२) आणि रोमारियो शेफर्ड (२२) यांनी त्याला मोलाची साथ दिली. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने ४ तर काईल जेमिसनने ३ बळी घेतले.
२४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात अगदी स्फोटक झाली. सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे (Devon Conway) आणि रचिन रवींद्र (Rachin Ravindra) यांनी पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची दमदार भागीदारी केली. रचिनने ४६ चेंडूंमध्ये ५६ धावांची अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत पाया तयार करून दिला.
मात्र, रचिन बाद झाल्यावर न्यूझीलंडच्या डावाला गळती लागली. एका पाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या आणि २९.१ षटकांत १९४ धावांवर न्यूझीलंडचे ५ फलंदाज तंबूत परतले. यादरम्यान, कॉन्वेनेही संयमी खेळी करून ९० धावांचे योगदान दिले. पण त्याची विकेट पडल्यानंतर वेस्ट इंडीजने सामन्यावर पकड मजबूत करायला सुरुवात केली. कॅरेबियन गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे न्यूझीलंडवर मोठे दडपण आले.
अखेरीस, अनुभवी टॉम लॅथम (Tom Latham) आणि कर्णधार मिचेल सँटनर यांनी एकत्र येत अत्यंत मोलाची भागीदारी केली आणि वेस्ट इंडीजच्या आशांवर पाणी फेरले. विशेषतः सँटनरने निर्णायक क्षणी जी आक्रमक फलंदाजी केली, तिने सामन्याचे चित्रच पालटले. त्याने केवळ १५ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा कुटल्या. लॅथमनेही २९ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा जोडल्या.
या दोघांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने ३४ षटकांचा खेळ संपण्यापूर्वी तीन चेंडू राखून ५ गडी गमावून लक्ष्याचा वेध घेतला आणि केवळ सामनाच नव्हे, तर मालिकाही जिंकली. शाय होपला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, पण विजयाचा शिल्पकार मात्र मिचेल सँटनरच ठरला.