लाहोर : वृत्तसंस्था
रचिन रवींद्र, केन विल्यमसन यांची तडफदार शतके आणि सँटेनर-फिलिप्स-हेन्रीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने दुसर्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी धुव्वा उडवला आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजणार्या डेव्हिड मिलरने नाबाद शतक झळकावले तरी तो दक्षिण आफ्रिकेचा पराभव टाळू शकला नाही. न्यूझीलंडने येथे निर्धारित 50 षटकांत 6 बाद 362 धावांचा डोंगर रचला, तर प्रत्युत्तरात शतकवीर मिलर, अर्धशतकवीर बवुमा, ड्युसेन यांच्या प्रतिकारानंतरही दक्षिण आफ्रिकेचा संघर्ष बराच तोकडा पडला आणि त्यांना 50 षटक ांत 9 बाद 312 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 363 धावांचे कडवे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेतर्फे मिलरने डावातील शेवटच्या चेंडूवर आपले शतक साजरे केले; पण यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून बराच दूर राहिला. मिलर 67 चेंडूंत 10 चौकार, 4 षटकारांसह 100 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय, ड्युसेनने 66 चेंडूंत 69, तर बवुमाने 71 चेंडूंत 56 धावा केल्या. मात्र, यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या आसपासही फिरकू शकला नाही. किवीज कर्णधार सँटेनरने 43 धावांत 3 बळी घेतले तर फिलिप्स, हेन्री यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रारंभी, रचिन रवींद्र (101 चेंडूंत 108) आणि केन विल्यमसन (94 चेंडूंत 102) यांच्या तडफदार शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 362 धावांचा डोंगर उभा केला. आयसीसी चॅम्पियन्स चषकाच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
रचिन रवींद्रच्या खेळीत 13 चौकार व एक षटकार, तर विल्यमसनच्या खेळीत 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. न्यूझीलंडने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगची विकेट लवकर गमावली. तो 21 धावांवर एन्गिडीच्या गोलंदाजीवर मार्करामकडे सोपा झेल देत बाद झाला. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी दुसर्या गड्यासाठी 164 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.
रचिन रवींद्रने 93 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील रचिनचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी, त्याने बांगला देशविरुद्धच्या साखळी सामन्यातही शतक झळकावले होते. रचिनसाठी वन-डे कारकिर्दीतील हे पाचवे शतक ठरले. पुढे रचिनला बाद करून कागिसो रबाडाने डोकेदुखी ठरलेली ही जोडी फोडली. मात्र, रचिन बाद झाल्यानंतरही विल्यमसनने फ टकेबाजी कायम ठेवत 91 चेंडूंत वन-डे क्रिकेटमधील आपले 15 वे शतक पूर्ण केले.
डॅरिल मिशेल या सामन्यात 49 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी उत्तम फटकेबाजी सुरू केली होती; पण नंतर एन्गिडीने मिशेलला बाद करून ही जोडी फोडली. यादरम्यान, न्यूझीलंडने 45.3 षटकांमध्ये 4 गडी गमावत 300 धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
या लढतीत रचिन रवींद्रप्रमाणे केन विल्यमसननेही चौफेर फटकेबाजी केली. त्याने येथे 91 चेंडूंत शतकाला गवसणी घातली. यातील दुसरे अर्धशतक, तर त्याने केवळ 30 चेंडूंतच साजरे केले होते!
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्या चित करत अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर त्याचवेळी आयसीसी चॅम्पियन्स चषक जेतेपदासाठी भारत-न्यूझीलंड हे संघ आमने-सामने भिडतील, हे सुस्पष्ट झाले. भारताने या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीतील पहिले स्थान निश्चित केले आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स जेतेपदाची निर्णायक लढत आता रविवार, दि. 9 मार्च रोजी दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 पासून रंगणार आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यात या स्पर्धेत साखळी फेरीत लढत झाली होती, त्यावेळी भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला होता. आता रविवारी हेच दोन्ही संघ जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकतील, त्यावेळी साखळी फेरीतील ‘तो’ विजय निश्चितच भारताचे मनोबल उंचावणारा ठरेल!
न्यूझीलंड : 50 षटकांत 6 बाद 362 (रचिन रवींद्र 101 चेंडूंत 13 चौकार, 1 षटकारासह 108, केन विल्यमसन 94 चेंडूंत 10 चौकार, 2 षटकारांसह 102, डॅरिल मिशेल 37 चेंडूंत 49, ग्लेन फिलिप्स 27 चेंडूंत नाबाद 49. लुंगी एन्गिडी 10 षटकांत 72 धावांत 3 बळी, रबाडा 10 षटकांत 2-70).
द. आफ्रिका : 50 षटक ांत 9 बाद 312. (डेव्हिड मिलर 67 चेंडूंत 10 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 100, रॅसी ड्युसेन 66 चेंडूंत 69, टेम्बा बवुमा 71 चेंडूंत 56. सँटेनर 3-43, फिलिप्स, मॅट हेन्री प्रत्येकी 2 बळी)