भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेस येत्या 24 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही देशांमधील या प्रारूपातील लढतीच्या आकडेवारीचा विचार केल्यास यामध्ये किवी संघच सरस ठरतो. दोन्ही संघांदरम्यान पहिला सामना 2007 मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपदरम्यान झाला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत दोन्ही संघात एकूण 11 वेळा गाठ पडली आहे. यामध्ये न्यूझीलंडने आठ लढतीत विजय मिळविला. तर, टीम इंडियाला 3 विजयांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, सध्या भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, मायदेशात दक्षिण आफ्रिका, बांगला देश, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघांवर वेगवेगळ्या मालिकेत विजय मिळविला आहे. यामुळे विराट सेना आगामी मालिकेत न्यूझीलंडमध्ये कशी कामगिरी करते, याची उत्सुकता आता शिगेस पोहोचली आहे. टीम इंडियाने आजपर्यंत 129 टी-20 सामने खेळताना 80 विजय मिळविले आहेत. तर, 44 वेळा पराभव पत्करला आहे. एक सामना टाय तर चार सामन्यांचा निकाल लागला नाही. न्यूझीलंडने 126 सामने खेळताना 61 वेळा विजय व 56 पराभव पत्करले आहेत. त्यांचे 6 सामने टाय व तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 16 सप्टेंबर 2007 रोजी झाला. हा सामना आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील होता. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. क्रिकेटच्या टी-20 या प्रारूपातील हा पहिलाच वर्ल्डकप होता. भारताला या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून अवघ्या 10 धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 190 धावा काढल्या व प्रत्युत्तरादाखल खेळणार्या भारताला 180 वर रोखून विजय मिळविला. या सामन्यात गौतम गंभीरने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली तर डॅनियल व्हिट्टोरीने 20 धावांत चार भारतीय फलंदाजांना बाद केले. मात्र, भारताने या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावताना वर्ल्डकप उंचावला होता.
2009 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर गेला होता. या दौर्यात दोन टी-20 सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. पहिला सामना 25 फेब्रुवारी 2009 रोजी ख्राईस्टचर्च येथील एएमआय स्टेडियमवर झाला. सुरेश रैनाच्या (नाबाद 61) अर्धशतकाच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 162 धावा काढल्या. मात्र, न्यूझीलंडने 18.5 षटकांत 3 बाद 166 धावा काढून 7 विकेटस्ने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
याच मालिकेतील दुसरा सामना 27 फेब्रुवारी 2009 रोजी वेलिंग्टन येथे खेळविण्यात आला. युवराज सिंगच्या (50) अर्धशतकाच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 149 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल खेळणार्या न्यूझीलंडने 5 बाद 150 धावा काढून सामना पाच विकेटस्ने जिंकत मालिकाही 2-0 अशी खिशात घातली.
2012 मध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौर्यावर आला होता. या दौर्यातील पहिली टी-20 पावसामुळे रद्द करण्यात आली होती. दुसरा टी-20 सामना 11 सप्टेंबर 2012 रोजी चेन्नईत झाला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 167 धावा काढल्या आणि प्रत्युत्तरादाखल खेळणार्या यजमान भारताला 4 बाद 166 धावांवर रोखून अवघ्या एक धावेने रोमांचक विजय मिळवत मालिका 1-0 अशी जिंकली. कोहलीने या सामन्यात 70 धावांची खेळी केली होती.
भारतात 2016 मध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 मार्च 2016 रोजी नागपूरमध्ये गाठ पडली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 126 धावा काढल्या. भारताने सुमार फलंदाजीचे दर्शन घडवत 18.1 षटकांत सर्वबाद 79 धावा काढल्या. यामुळे न्यूझीलंडने हा सामना 47 धावांनी जिंकत भारताविरुद्धची विजयी वाटचाल कायम ठेवली.
2017-18 च्या हंगामात न्यूझीलंडचा संघ भारत दौर्यावर आला होता. या दौर्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. यातील पहिला सामना 1 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत झाला. या सामन्यात रोहित शर्मा (80) व शिखर धवन (80) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरादाखल खेळणार्या न्यूझीलंडला 8 बाद 149 वर रोखून 53 धावांनी भारताने विजय मिळविला. टीम इंडियाचा हा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला
विजय ठरला.
मालिकेतील दुसरा सामना 4 नोव्हेंबर 2017 रोजी राजकोट येथे झाला. कोलिन मुन्रो (109) याच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 196 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल खेळणार्या भारताला 7 बाद 156 वर रोखून 40 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
मालिकेतील तिसरा सामना तिरूवअनंतपूरम येथे 7 नोव्हेंबर 2017 रोजी झाला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी आठ-आठ षटकांचा खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 बाद 67 धावा काढल्या. न्यूझीलंडला मात्र 61 धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले. हा सामना 6 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशा फरकाने भारताने जिंकली. बुमराहने 'मालिकावीर'चा पुरस्कार पटकावला.
2018-19 या हंगामात भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर गेला होता. या दौर्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. पहिला सामना 6 फेब्रुवारी 2019 रोजी वेलिंग्टन येथे झाला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा करून प्रत्युत्तरादाखल खेळणार्या भारताला 19.2 षटकांत 139 धावांवर रोखत 80 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.
मालिकेतील दुसरा सामना 8 फेब्रुवारी 2019 रोजी ऑकलंड येथे आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 158 धावा काढल्या. रोहित शर्मा (50) व ऋषभ पंत (नाबाद 40) यांच्या चिवट फलंदाजीच्या बळावर भारताने 18.5 षटकांत 3 बाद 162 धावा काढून सामना सात विकेटस्ने जिंकला. याबरोबर मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली.
मालिकेतील तिसरा टी-20 सामना 10 फेब्रुवारी 2019 रोजी हॅमिल्टन येथे झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 4 बाद 212 धावा काढल्या. टीम इंडियानेही जबरदस्त झुंज देत 20 षटकांत 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली. यामुळे न्यूझीलंडने 4 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली. न्यूझीलंडचा हा भारताविरुद्धचा आठवा विजय ठरला.