नेदरलँडच्‍या बास डी लीडे याने ४८ चेंडूंत ७२ धावांची नाबाद आक्रमक खेळी केली.  
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 |नामिबियावर दिमाखदार विजय, गुणतालिकेत नेदरलँडने पाकिस्तानला टाकले पिछाडीवर

बास डी लीडे याने ४८ चेंडूंत ७२ धावांची नाबाद आक्रमक खेळी

पुढारी वृत्तसेवा

T20 World Cup 2026 Netherlands beat Namibia

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील १० व्या सामन्यात नेदरलँड्सने नामिबियाचा ७ गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बास डी लीडे याने ४८ चेंडूंत ७२ धावांची नाबाद आक्रमक खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या विजयासह नेदरलँड्सने गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

नामिबियाची झुंज अपयशी

नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने २० षटकांत ८ बाद १५६ धावापर्यंत मजल मारली. नामिबियाकडून जेन निकोलने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर जैन फ्रीलिंकने ३० धावांची खेळी केली. मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने नामिबियाला १६० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. नेदरलँड्सतर्फे बास डी लीडे आणि लोगन वान बीक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर आर्यन दत्त आणि फ्रेड क्लासेन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

नेदरलँडने १८ व्‍या षटकांत गाठले १५७ धावांचे लक्ष्‍य

१५७ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅक्स ओडॉड (७) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मायकेल लेविट (२८) आणि बास डी लीडे यांनी डावाला आकार दिला. कॉलिन एकरमनने ३२ धावांचे योगदान दिले. मात्र, सामन्याचा खरा नायक बास डी लीडे ठरला. त्याने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा ठोकल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने १८ धावा करत त्याला मोलाची साथ दिली. नेदरलँडने १८ व्‍या षटकांत १५७ धावांचे लक्ष्‍य गाठत ७ गडी राखून विजय मिळवला.

गुणतालिकेत पाकिस्‍तान पिछाडीवर

या विजयामुळे ग्रुप-ए मध्ये नेदरलँड्सचे दोन सामन्यांतून २ गुण झाले असून +०.३५६ नेट रनरेटसह ते दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. भारताने एक सामना जिंकून २ गुणांसह (+१.४५० रनरेट) अव्वल स्थान कायम राखले आहे. पाकिस्तानचा संघ २ गुणांसह (+०.२४० रनरेट) तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. नामिबिया चौथ्या, तर अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT