स्पोर्ट्स

NEP vs WI : नेपाळचा विंडीजविरुद्ध ऐतिहासिक मालिकाविजय, मालिका 2-0 ने जिंकली

आसिफ, जोरा यांची अर्धशतके निर्णायक, कोणत्याही पूर्ण वेळ सदस्य देशाविरुद्ध नेपाळचा पहिलाच मालिकाविजय

रणजित गायकवाड

शारजाह : विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात धडाकेबाज विजय मिळवणार्‍या नेपाळने सलग दुसर्‍या लढतीतही तोच धडाका कायम राखला आणि विंडीजला 90 धावांनी नमवत एका ऐतिहासिक मालिकाविजयाची नोंद केली. तीन दिवसांपूर्वी, नेपाळने कोणत्याही पूर्ण-सदस्य देशाविरुद्ध टी20 मालिका खेळली नव्हती. आता, एक सामना शिल्लक असतानाच त्यांनी ही मालिका 2-0 ने जिंकून इतिहास रचला आहे.

या लढतीत नेपाळने 20 षटकात 6 बाद 173 धावा केल्या तर प्रत्युत्तरात विंडीजचा डाव अवघ्या 83 धावांवर खुर्दा झाला. नेपाळच्या गोलंदाजांनी वापरलेले धीम्या गतीचे चेंडू आणि अचूक ब्लॉकहोलमधील यॉर्कर हे त्यांच्या यशाचे गमक ठरले. वेस्ट इंडिजच्या अननुभवी फलंदाजांना फटके खेळताना प्रचंड अडचण येत होती.

जेसन होल्डरचा 15 चेंडूंतील 21 धावांचा अपवाद वगळता, कोणताही फलंदाज सहज खेळू शकला नाही. 83 धावा ही माजी टी20 विश्वविजेत्यांची सहावी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे, तर 90 धावांनी झालेला पराभव हा धावांच्या फरकाने त्यांचा संयुक्तपणे चौथा सर्वात मोठा पराभव आहे.

मध्यमगती गोलंदाज मोहम्मद आदिल आलमने (4/24) वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुंग लावला. दोन्ही संघांमधील सर्वात मोठा फरक ठरला तो म्हणजे नेपाळचे क्षेत्ररक्षण. आठव्या षटकात 19 वर्षीय गुलशन झा याने स्वीपर कव्हरला धावत जाऊन घेतलेला अप्रतिम झेल हे त्याचे उत्तम उदाहरण होते. या झेलमुळे 16 चेंडूंत केवळ 6 धावा करणारा काइल मेयर्स तंबूत परतला होता.

त्यानंतर वेस्ट इंडिजची परिस्थिती आणखीच बिकट झाली. मधल्या षटकांमध्ये त्यांचे गडी नियमित अंतराने बाद होत राहिले आणि नेपाळच्या क्षेत्ररक्षकांनी चपळाईने चेंडू अडवत धावा रोखून धरल्या. आलमने अकीम ऑगस्ट (17) आणि अमीर जांगू (16) यांना सलग षटकांमध्ये बाद केले. त्यावेळी वेस्ट इंडिजची अवस्था 5 बाद 63 झाली होती आणि आवश्यक धावगती 13 च्या वर गेली होती.

संक्षिप्त धावफलक : नेपाळ: 6 बाद 173 (आसिफ 68, जोरा 63; होसेन 2-21) वेस्ट इंडिज: 83 (होल्डर 21; आलम 4-24, भुर्तेल 3-16).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT