स्पोर्ट्स

Lionel Messi : मेस्सीचे दुहेरी गोल, इंटर मियामीची उपांत्य फेरीत धडक

एम.एल.एस. कप फुटबॉल स्पर्धा : आता मुकाबला रंगणार सिनसिनाटीविरुद्ध

रणजित गायकवाड

इंटर मियामी संघाने लिओनेल मेस्सीच्या शानदार खेळाच्या जोरावर नॅशव्हिल एस.सी. संघाचा 4-0 असा धुव्वा उडवत प्रथमच एम.एल.एस. कप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. मेस्सीने या सामन्यात दोन गोल केले आणि इतर दोन गोलसाठी असिस्ट केले.

अर्जेंटिनाच्या या 38 वर्षीय दिग्गज खेळाडूने पहिल्या सत्रातच 2 वेळा गोलजाळ्याचा अचूक वेध घेत इंटर मियामी संघाला सामन्यावर उत्तम वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतर ब्रेकनंतर दुसऱ्या सत्रात त्याच्या बिनचूक पासच्या बळावर मियामीला आणखी दोन गोल करता आले.

या विजयामुळे जेवियर मास्चेरानो यांच्या नेतृत्वाखालील मियामीने ‌’बेस्ट-ऑफ-थ्री‌’ मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. पहिल्या सामन्यात त्यांनी 3-2 असा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना 2-1 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले होते. मेस्सीने या संपूर्ण मालिकेत पाच गोल आणि तीन असिस्ट केले. मियामीने 3 सामन्यांमध्ये केलेल्या सर्व गोलांमध्ये मेस्सीचा थेट सहभाग होता, हे यावेळी अधोरेखित झाले.

लायोनेल मेस्सीने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे विशेष अभिनंदन करु इच्छितो. अतिशय दडपणाची स्थितीही त्याने सहजपणे हाताळली आणि योग्य वेळी असिस्टही केले. चेंडू ताब्यात असताना लायोनेल मेस्सी कसा खेळतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, चेंडूचा ताबा घेऊन वर्चस्व कसे गाजवायचे, याचा वस्तूपाठ त्याने आज प्रतिस्पर्ध्यांना घालून दिला आहे.
-इंटर मियामीचे प्रशिक्षक मास्चेरानो.

मागील तीन हंगामांपैकी दोन हंगामांत पहिल्या फेरीतच पराभूत झालेल्या मियामीचा सामना आता एफ.सी. सिनसिनाटी या संघाविरुद्ध एकाच उपांत्य फेरीच्या सामन्यात होणार आहे. हा सामना 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी होईल.

शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात मिनेसोटा युनायटेडने रोमांचक 3-3 अशा बरोबरीनंतर सीएटल साउंडर्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 7-6 असा पराभव केला. आता ते रविवारी होणाऱ्या पोर्टँड ट्रेलब्लेझर्स आणि सॅन दिएगो एफ.सी. यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी भिडतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT