शिमकेंट (कझाकिस्तान): वृत्तसंस्था : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या नीरू धांडाने सोमवारी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारतासाठी पुरुषांच्या गटात भवनीश मेंदिरट्टाने रौप्यपदक जिंकले, तर महिलांमध्ये आशिमा अहलावतने कांस्यपदकाची कमाई केली.
अंतिम फेरीत नीरूने 43 गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. तिने कतारच्या बासिल रे (37 गुण) आणि भारताच्याच आशिमा अहलावत (29 गुण) यांना मागे टाकले. आशिमाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या ट्रॅप प्रकाराच्या अंतिम फेरीत, भवनीशने 45 गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या यिंग की याने 47 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर त्याचाच सहकारी पेंग्यू चेन याला 35 गुणांसह कांस्यपदक मिळाले. तत्पूर्वी, पात्रता फेरीत भवनीश चौथ्या स्थानी होता. याच प्रकारात अन्य भारतीय नेमबाज कायनान चेनाई 15 व्या, तर लक्ष्य 41 व्या क्रमांकावर राहिला.
भारताच्या नेमबाजांनी 25 मीटर पिस्तूल महिला ज्युनिअर गटाच्या अंतिम फेरीत पूर्णपणे वर्चस्व राखले. पायल खत्रीने एकूण 36 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर नाम्या कपूर (30 गुण) आणि तेजस्विनी (27 गुण) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या संघाने एकूण 1700 गुणांसह सांघिक रौप्यपदकही पटकावले. ते कोरियाच्या मागे, तर यजमान देश कझाकिस्तानच्या पुढे राहिले.
दोन ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिली. यानंतर भारतीय नेमबाजांनी ज्युनिअर गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले. मनू भाकरची सहकारी ईशा सिंग आठ महिलांच्या अंतिम फेरीत 18 गुणांसह सहाव्या स्थानी राहिली. भाकरने 25 गुणांची कमाई केली. व्हिएतनामची थू विन्ह त्रिन्ह (29 गुण) तिच्यापेक्षा 4 गुणांनी आघाडीवर राहत क ांस्यपदकाची मानकरी ठरली.