नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा दिग्गज भालाफेकपटू आणि दोन ऑलिम्पिक पदकांचा मानकरी नीरज चोप्राने प्रशिक्षक यान झेलेझनी यांच्यापासून आपण फारकत घेत असल्याची घोषणा शनिवारी केली. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजने झेलेझनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणास सुरुवात केली होती.
28 वर्षीय नीरज चोप्रा सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. याच दुखापतीमुळे गेल्या वर्षी (2025) टोकिओ येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आपल्या निवेदनात नीरजने म्हटले की, यान झेलेझनी यांच्यासोबत काम केल्यामुळे तंत्र, लय आणि हालचालींबाबत अनेक नवे द़ृष्टिकोन लाभले. प्रत्येक सत्रातून मला खूप काही शिकायला मिळाले. ते केवळ इतिहासातील सर्वोत्तम भालाफेकपटूच नाहीत, तर एक उत्तम व्यक्तिमत्त्व देखील आहेत. झेलेझनी यांनीही नीरजचे कौतुक केले. ‘नीरजसारख्या खेळाडूला प्रशिक्षण देणे हा एक विलक्षण अनुभव होता. आम्ही एकत्र काम केले आणि त्याने पहिल्यांदा 90 मीटरचा टप्पा ओलांडला याचा मला आनंद आहे,’ असे ते म्हणाले.
आजवरच्या यशस्वी वाटचालीत नीरजचे बहुतांशी प्रशिक्षक विदेशी 2016 मध्ये पोलंडमधील कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 86.48 मीटरचा विक्रम प्रस्थापित करून नीरज जागतिक स्तरावर चर्चेत आला. तेव्हापासून त्याने अनेक परदेशी प्रशिक्षकांसोबत काम केले आहे. ऑस्ट्रेलियाचे गॅरी कॅल्व्हर्ट आणि जर्मनीचे उवे होन यांच्यानंतर क्लॉस बार्टोनीझ यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजने यशाची मोठी शिखरे सर केली. बार्टोनीझ यांच्या प्रशिक्षणात त्याने 20-21 टोकिओ ऑलिम्पिक सुवर्ण, 2023 जागतिक अजिंक्यपद सुवर्ण आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले. बार्टोनीझ यांच्यानंतर नीरजने झेलेझनी यांची निवड केली होती.
पुढील योजनांबाबत बोलताना नीरज म्हणाला, मी 2026 कडे मोठ्या आशेने पाहत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच मी सरावाला सुरुवात केली आहे. तंदुरुस्त राहणे हेच माझे मुख्य ध्येय असून लवकरच पुनरागमन करण्यासाठी मी उत्सुक आहे. 2027 ची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि 2028 चे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक हे माझे दीर्घकालीन लक्ष्य आहे.