Diamond League Final 2025
नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचलेल्या नीरजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ९१.५१ मीटरच्या आपल्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपदावर नाव कोरले, तर नीरजला ८५.०१ मीटरच्या कामगिरीसह रौप्यपदक मिळाले. नीरजने २०२२ मध्ये डायमंड लीगची ट्रॉफी जिंकली होती, मात्र २०२३ आणि त्यानंतर यंदाही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
या हंगामात नीरजची कामगिरी चांगली राहिली होती. डायमंड लीगच्या चारपैकी दोन पात्रता फेऱ्यांमध्ये भाग घेऊनही तो चौथ्या स्थानी राहत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. याच हंगामात त्याने ९० मीटरचा टप्पाही ओलांडला होता, जो त्याच्यासाठी एक मोठे आव्हान बनला होता. मे महिन्यात दोहा येथे झालेल्या स्पर्धेत त्याने ९०.२३ मीटर भालाफेक केली होती. त्यानंतर जूनमध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत ८८.१६ मीटरच्या कामगिरीसह त्याने विजेतेपद पटकावले होते. मात्र, डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याला जर्मनीच्या वेबरला मागे टाकता आले नाही.
जर्मनीच्या ज्युलियन वेबरने पहिल्याच प्रयत्नात ९१.३७ मीटर भाला फेकून नीरजवर प्रचंड दडपण आणले. याउलट, नीरजने पहिल्या प्रयत्नात ८४.३५ मीटर भाला फेकला आणि तो तिसऱ्या स्थानावर होता. त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट ८४.९५ मीटरसह दुसऱ्या स्थानी होता. वेबरने आपला धडाका कायम ठेवत दुसऱ्या प्रयत्नात ९१.५१ मीटर लांब भाला फेकला आणि आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले. हीच कामगिरी त्याला विजेतेपद मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली. दुसरीकडे, नीरजने दुसऱ्या प्रयत्नात केवळ ८२ मीटर भाला फेकला, ज्यामुळे तो तिसऱ्याच स्थानी राहिला. दडपणाखाली खेळणारा नीरज लयीत दिसत नव्हता. त्याचे तिसरे, चौथे आणि पाचवे असे सलग तीन प्रयत्न फाऊल ठरले. असे असूनही, तो तिसऱ्या स्थानावर कायम राहिला. दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या नीरजने अखेर सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात आपला अनुभव पणाला लावला. त्याने ८५.०१ मीटर लांब भाला फेकून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आणि रौप्यपदक निश्चित केले. या थ्रोमुळे त्याने केशॉर्न वॉलकॉटला तिसऱ्या स्थानावर ढकलले. वॉलकॉट ८४.९५ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह तिसऱ्या स्थानी राहिला.