Neeraj Chopra injury  Pudhari
स्पोर्ट्स

Neeraj Chopra injury : दुखापतीचे शुक्लकाष्ठ कायम, नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकणार

घोट्याच्या स्नायूंच्या गंभीर दुखापतीमुळे २०२६ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर

पुढारी वृत्तसेवा

Neeraj Chopra injury : अभ्यास सत्रादरम्यान घोट्याचे स्नायू (लिगामेंट) फाटल्यामुळे भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा २०२६ च्या संपूर्ण उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. या दुखापतीमुळे त्याला आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि डायमंड लीग फायनलला मुकावे लागणार असून, लय सापडत असतानाच त्याचा २०२६ वर्षाचा हंगाम दुर्दैवाने समाप्त झाला आहे.

नीरजने इंस्‍टा पोस्‍टने के हंगाम संपवत असल्‍याचे जाहीर

लॉझेन डायमंड लीगमध्ये नीरजने या वर्षातील तिसऱ्या स्पर्धेत मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, २९ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे त्याने हंगाम संपवत असल्याचे स्पष्ट केले."दुर्दैवाने, सरावादरम्यान माझ्या घोट्याचे लिगामेंट टियर (स्नायू फाटणे) झाले. डॉक्टर आणि माझ्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर, मी या मोसमातील उर्वरित स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे," असे नीरजने नमूद केले.

दीर्घ विश्रांतीनंतर दोहा डायमंड लीगद्वारे केले होते पुनरागमन

२८ वर्षीय नीरजने दुखापतीच्या दीर्घ विश्रांतीनंतर जूनमध्ये दोहा डायमंड लीगद्वारे पुनरागमन केले होते, जिथे तो ८५.६९ मीटर फेकीसह चौथ्या स्थानावर राहिला. यानंतर ग्लासगोमध्ये ८५.८३ मीटर कामगिरीसह त्याने रौप्यपदक जिंकले आणि लॉझेनमध्ये मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

नीरजचा हंगाम अपूर्ण; डायमंड लीगचे स्वप्न भंगले

पुनरागमन करताना नीरजची कामगिरी संमिश्र राहिली. ग्लासगोमध्ये त्याने पदक निश्चित केले असले तरी श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८९.७५ मीटरचा लांब फेक करत सुवर्णपदक पटकावले. लॉझेनमधील स्पर्धा ही आशियाई खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात होती, मात्र हीच त्याची २०२६ मधील शेवटची स्पर्धा ठरली.या दुखापतीमुळे डायमंड लीग फायनल खेळण्याच्या त्याच्या आशांवरही पाणी फेरले गेले आहे. गुणतालिकेत सातव्या स्थानावर असलेला नीरज अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम होता.

भारताच्या सुवर्णपदकाच्या आशेला मोठा धक्का

जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा फटका बसला आहे. आपल्या जेतेपदाचा बचाव करण्याची संधी आता त्याच्या हातातून निसटली आहे. नीरजच्या माघारीनंतर आता सर्वांच्या नजरा रोहित यादववर खिळल्या आहेत. रोहितने नुकताच भुवनेश्वर येथील 'वर्ल्ड ॲथलेटिक्स सिल्व्हर लेव्हल कंटिनेंटल टूर'मध्ये ८७.६८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे नीरजच्या अनुपस्थितीत भालाफेक प्रकारात रोहित भारताचे प्रतिनिधित्व करणारा प्रमुख खेळाडू असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT