मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएल प्ले-ऑफमधील अंतिम जागा निश्चित करण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ आज (रविवार, दि. 24) मुंबई इंडियन्सविरुद्ध पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. वानखेडे स्टेडियमवर रविवारी दुपारी होणार्या या सामन्यात दोन्ही संघांच्या तंदुरुस्तीची देखील कसोटी लागणार आहे. आधीच स्पर्धेतून बाद झालेल्या मुंबई इंडियन्सचा संघ विजयाने स्पर्धेचा शेवट करण्यास उत्सुक असेल, तर राजस्थान रॉयल्सला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी फक्त आणि फक्त विजयाचीच गरज आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी फॉर्मात असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीला रोखणे हे मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठे आव्हान असेल. स्थानिक खेळाडू असलेल्या जैस्वालने गुवाहाटी येथे झालेल्या मागील सामन्यात जसप्रीत बुमराह आणि कंपनीविरुद्ध अवघ्या 32 चेंडूंत 77 धावा कुटल्या होत्या. याव्यतिरिक्त 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी राजस्थानसाठी महत्त्वाची ठरेल. कर्णधार रियान पराग आणि ध्रुव ज्युरेल यांना मात्र मधल्या फळीत अधिक सातत्य दाखवावे लागेल.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या खराब फॉर्मशी झगडत असला, तरी आपल्या घरच्या मैदानावर प्रतिष्ठेसाठी खेळताना ते राजस्थानचे गणित बिघडवू शकतात. गेल्या पाच सामन्यांत दोन्ही संघांची कामगिरी सारखीच (3 पराभव, 2 विजय) राहिली आहे. मुंबईचे स्टार भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांच्याकडे या हंगामातील शेवटच्या सामन्यात प्रभाव पाडण्याची उत्तम संधी आहे. दुसरीकडे, गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या जसप्रीत बुमराहसाठी या मोहिमेचा शेवट विश्रांतीची संधी घेऊन येईल. यामुळे तोही येथे महत्त्वाकांक्षेने मारा करणे अपेक्षित आहे.
विजय मिळवल्यास : मुंबईवर मात केल्यास राजस्थानचे 16 गुण होतील. यामुळे ते पंजाब किंग्ज (13 गुण) आणि कोलकाता नाईट रायडर्स (13 गुण) यांना मागे टाकत थेट प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील.
पराभूत झाल्यास : राजस्थानचा पराभव झाल्यास, त्यांचे 14 गुणच राहतील. अशा परिस्थितीत त्यांना पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांनी आपापल्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे, या अपेक्षेवर अवलंबून राहावे लागेल.