पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सचा ताण वाढू शकतो. खरंतर, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन लांबणीवर पडू शकते. मार्च महिन्यात तो एमआयसाठी तीन सामने खेळू शकला नाही. आता अशी बातमी आहे की, त्याच्या पुनरागमनाला आणखी काही वेळ लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह किमान पुढील एक आठवडा तरी चालू हंगामात खेळण्याची शक्यता कमी आहे. (Jasprit Bumrah Mumbai Indians)
बुमराह बऱ्याच काळापासून मैदानापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो मैदानाबाहेर पडला होता आणि त्यानंतरही तो अद्याप पुनरागमन करू शकलेला नाही. चाहते बुमराहला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अहवालानुसार, बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. मात्र, BCCIच्या वैद्यकीय टीमला वाटते की त्याचा वर्कलोड लगेचच वाढवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्याला आणखी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आयपीएलनंतर भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळायची आहे. दरम्यान, या मालिकेत बुमराहला खेळवण्यासाठी निवड समिती आग्रही आहे. त्यामुळे आयपीएलमधील त्याचे पुनरागमन लांबणीवर पडल्याची देखील चर्चा आहे.
बुमराहची दुखापत थोडी गंभीर आहे. अशा परिस्थितीत, त्याला पुन्हा स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. बुमराह स्वतःही याबद्दल खूप दक्ष आहे. त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. पण त्याला पूर्ण फॉर्ममध्ये परत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. सध्या त्याच्या परतीची तारीख निश्चित केलेली नाही. पण, एप्रिलच्या मध्यापर्यंत तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे, असेही अहवालात म्हटले आहे.