स्पोर्ट्स

MI New Captain : मुंबई इंडियन्सला मिळणार नवा कर्णधार! पंजाबविरुद्धच्या सामन्यात होणार घोषणा; सूर्या-हार्दिकने सोडली संघाची साथ

IPL 2026 : क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण, मुंबई इंडियन्ससमोर नेतृत्वाचा मोठा पेच

रणजित गायकवाड

धर्मशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात १४ मे रोजी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, प्ले-ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आता नेतृत्वाचे मोठे पेचप्रसंग उभे राहिले आहेत. संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या संघासोबत नसल्याने, पंजाबविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत मुंबईची कमान कोणाच्या हाती असेल, याबाबत क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पंड्या दुखापतीमुळे मुंबईतच; खेळण्यावर प्रश्नचिन्ह

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. उर्वरित सामने आता केवळ औपचारिकता उरले असले तरी, पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'क्रिकबझ'ने दिलेल्या अहवालानुसार, हार्दिक पंड्या अद्याप धर्मशाला येथे पोहोचलेला नाही. तो सध्या मुंबईत असून पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. या हंगामात दुखापतीमुळे तो आधीच दोन सामन्यांना मुकला होता. आता पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याच्या सहभागाबाबत मोठी साशंकता वर्तवण्यात येत आहे.

सूर्या कुटुंबियांसोबत व्यस्त; बुमराह किंवा रोहितकडे नेतृत्व?

दुसरीकडे, सूर्यकुमार यादवदेखील अद्याप धर्मशाला येथे संघासोबत दाखल झालेला नाही. सूर्यकुमारची पत्नी देविशाने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, सूर्या सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र, तो पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर हार्दिक पंड्या खेळू शकला नाही, तर सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल. पण, जर हार्दिक आणि सूर्या हे दोन्ही दिग्गज उपलब्ध नसतील, तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व अनुभवी रोहित शर्मा किंवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यापैकी कोणाकडे तरी सोपवले जाऊ शकते.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी

पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी २०२६ चा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. खराब फलंदाजी आणि कमकुवत गोलंदाजीमुळे संघाला मोठी किंमत मोजावी लागली. विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराह या हंगामात आपल्या फॉर्मशी झुंज देताना दिसला, तर हार्दिक पंड्यालाही ना बॅटने ना बॉलने कमाल दाखवता आली. मुंबईने आतापर्यंत ११ सामन्यांपैकी ८ सामने गमावले असून केवळ ३ सामन्यांत विजय मिळवला आहे.

कर्णधारपदावर टांगती तलवार

संघाच्या या मानहानीकारक कामगिरीनंतर हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन हार्दिकच्या नेतृत्वावर समाधानी नसून, पुढील हंगामात त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यामुळे आगामी काळात मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT