धर्मशाळा; वृत्तसंस्था : प्ले-ऑफच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकले गेलेल्या मुंबई इंडियन्सने येथील ‘आयपीएल’ साखळी सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा जोरदार झटका दिला आणि यामुळे पंजाबचा संघ आणखी अडचणीत सापडला. पंजाबसाठी हा सलग पाचवा पराभव ठरला असून, यामुळे त्यांच्या प्ले-ऑफ गाठण्याच्या आशाअपेक्षांना आणखी एक धक्का बसला. अवघ्या 33 चेंडूंत नाबाद 75 धावा फटकावणारा तिलक वर्मा येथे मुंबईच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला.
पंजाबने या लढतीत प्रभसिमरन सिंगच्या नाबाद 57 धावांच्या खेळीमुळे 8 बाद 200 धावांचा डोंगर रचला. मात्र, प्रत्युत्तरात तिलकचा झंझावात येथे अवतरला आणि मुंबईने 6 गडी व एका चेंडूचा खेळ बाकी राखत विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान असताना मुंबईला रियान रिकल्टन व रोहित शर्मा यांनी 6.3 षटकांत 61 धावांचा फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला. त्यानंतर तिसर्या क्रमांकावरील नमन धीरला 9 धावांवरच परतावे लागले. तिलक वर्माने मात्र जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडत तडफदार अर्धशतक साजरे केले आणि नंतर विजयही मिळवून दिला.
प्रभसिमरनची फटकेबाजी
प्रारंभी, सलामीवीर प्रभसिमरन सिंगचे शानदार अर्धशतक आणि तळाच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने 8 बाद 200 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने 4 बळी घेत पंजाबच्या डावाला खिंडार पाडले होते. मात्र, पंजाबने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत दमदार पुनरागमन केले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने 33 चेंडूंत 50 धावांची वादळी भागीदारी करत पंजाबला आक्रमक सुरुवात करून दिली. प्रियांश 27 धावांवर बाद झाल्यानंतरही प्रभसिमरनने मुंबईच्या गोलंदाजांवर प्रहार सुरूच ठेवला होता.
तिलकच्या खेळीत 6 चौकार, 6 षटकार!
विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान असताना तिलक वर्माने नाबाद 75 धावा फटकावल्या आणि तोच या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या या धमाकेदार खेळीत 6 चौकार व 6 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला.