स्पोर्ट्स

Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये भूकंप! फ्रँचायझीने मोठा निर्णय घेत बदलला मुख्य कोच, RCB ला चॅम्पियन बनवणा-याकडे सोपवली धुरा

लिसा कीथलींचा अचानक राजीनामा, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नेमकं काय घडतंय?

रणजित गायकवाड

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या आगामी २०२७ हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने मोठा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक विल्यम्स यांच्याकडे महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे. या पदावर कार्यरत असणाऱ्या लिसा कीथली यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल डेव्हलपमेंट प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यामुळे राजीनामा दिला.

त्यांच्या कार्यकाळात मुंबईला गुणतालिकेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, जे फ्रँचायझीचे लीगमधील आतापर्यंतचे सर्वात निराशाजनक प्रदर्शन ठरले. २०२३ व २०२५ चे जेतेपद आणि २०२४ मध्ये एलिमिनेटर गाठणाऱ्या मुंबई इंडियन्सला आता पुन्हा विजयी मार्गावर आणण्याचे आव्हान फ्रँचायझीने विल्यम्स यांच्याकडे सोपवले आहे.

विल्यम्स यांचा प्रशिक्षक म्हणून दांडगा अनुभव आणि यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) महिला संघाने ऐतिहासिक जेतेपद पटकावले होते. याशिवाय, महिला बिग बॅश लीगमध्ये (WBBL) अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सने त्यांच्या कार्यकाळात २०२२ आणि २०२३ अशी सलग दोन वर्षे अजिंक्यपद राखले.

इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत २०२३ मध्ये विजेत्या ठरलेल्या सदर्न ब्रेव्ह संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक होते. तसेच खेळाडू म्हणून त्यांनी ग्रेड क्रिकेटमध्ये तीन वेळा प्रतिष्ठित ‘ब्रॅडमन मेडल’ पटकावले आहे.

या नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त करताना ल्यूक विल्यम्स म्हणाले की, मुंबई इंडियन्ससारख्या प्रतिष्ठित आणि यशस्वी फ्रँचायझीशी जोडले जाणे अत्यंत अभिमानास्पद आहे. प्रतिभावान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या साथीने संघ म्हणून एकत्र येत काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण घडवण्याची, दर्जेदार क्रिकेट खेळण्याची आणि यशाची नवी शिखरे गाठण्याची ही एक उत्तम संधी आहे.

फ्रँचायझीच्या मालकिन नीता अंबानी यांनीही त्यांचे स्वागत करताना, विल्यम्स यांच्याकडे अफाट अनुभव, महिला क्रिकेटची सखोल जाण आणि खेळाडूंच्या विकासाप्रती प्रचंड निष्ठा असल्याचे नमूद केले.

आगामी हंगामाच्या दृष्टीने विल्यम्स यांच्यासमोर २८ सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी खेळाडूंच्या रिटेन्शनची यादी तयार करण्याचे पहिले मोठे आव्हान असेल. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे लिलाव पार पडणार असून, १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत महिला प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT