पुणे वृत्तसंस्था : लागोपाठ चार पराभव स्वीकारल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला मुंबईचा संघ बुधवारी पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पंजाब किंग्जशी दोन हात करणार आहे.
तब्बल पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला अजूनही सूर सापडलेला नाही. नावाजलेले खेळाडू या चमूत आहेत. मात्र, प्रत्यक्ष मैदानात ते कच खाताना दिसत आहेत. त्यामुळे निदान पंजाबविरुद्ध तरी या संघाला विजय मिळेल, अशी अपेक्षा मुंबईचे चाहते व्यक्त करत आहेत. जर हा सामनाही गमावला, तर मुंबईला अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवणे जवळपास अशक्य होणार आहे. त्यामुळेच त्यांना पंजाबविरुद्ध करो वा मरो या न्यायाने खेळ करणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर, रोहित आणि त्याच्या सहकार्यांचे सध्या जोरदार समुपदेशन केले जात आहे. सततच्या पराभवांमुळे रोहित शर्माची चीडचीड वाढली आहे. पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी त्याचा प्रत्यय आला होता.
दुसरीकडे, मयांक अग्रवाल याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाने चार सामन्यांत दोन विजय आणि एक पराभव अशी बर्यापैकी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत. हा संघ मुंबईला पराभूत करून आणखी दोन गुणांची कमाई करण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही आमच्या संघात बदल करणार नाही, असे मयांकने सूचित केले आहे. तसेच या लढतीत नाणेफेकीचा कौल महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्याने म्हटले आहे.
पंजाबला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरण्याचा ठाम निश्चय आम्ही केला आहे. आता तरी पराभवाचे ग्रहण सुटेल, अशी अपेक्षा आहे.
– रोहित शर्मा (मुंबईचा कर्णधार)जरी मुंबईने चार पराभव स्वीकारले असले, तरी आम्ही त्यांना सहजतेने घेणार नाही. दिग्गजांचा भरणा असलेला त्यांचा चमू लढवय्या आहे.
– मयांक अग्रवाल (पंजाबचा कर्णधार)