मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि त्यांचे लाडके 'थाला' म्हणजेच महेंद्रसिंह धोनी यांच्यातील अतूट नाते आता संपुष्टात येणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनात सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त समोर आले असून, या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांनी क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असलेल्या वृत्तानुसार, अनुभवी कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२६ च्या हंगामानंतर चेन्नई फ्रँचायझीसोबतचा आपला ऐतिहासिक प्रवास संपवू शकतो. दरम्यान, धोनी किंवा सीएसके व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
सन २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यापासून धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स हे समीकरण चाहत्यांसाठी एक भावना बनले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा येण्याची नुसती शक्यताही सीएसकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक आणि अकल्पनीय असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या जवळपास दोन दशकांत धोनी आणि सीएसके यांनी मिळून अनेक आयपीएल विजेतेपदे पटकावली आणि एक अनोखी फॅन संस्कृती निर्माण केली. मात्र, सध्याच्या घडोमोडींवर विश्वास ठेवला, तर आयपीएल २०२६ हा 'थाला' आणि सीएसके व्यवस्थापनातील नाट्यमय आणि भावनिक घटस्फोटाची सुरुवात ठरू शकतो.
चालू हंगामाचा विचार केला तर, आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी धोनीच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने अद्याप या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतरही, संघाचे संतुलन बिघडू नये म्हणून या ४४ वर्षीय दिग्गज खेळाडूने अंतिम अकरा (Playing XI) मधून बाहेर राहणे पसंत केले होते.
विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीएसकेच्या गोटात गेल्या काही काळापासून संघबांधणी, महत्त्वाचे निर्णय आणि धोनीनंतर फ्रँचायझीच्या भविष्यातील नियोजनावरून अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. धोनीचा थेट सहभाग नसताना संघ व्यवस्थापनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे तो नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आयपीएल २००८ पासून धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स ही दोन नावे एकमेकांत इतकी एकरूप झाली आहेत की, त्यांच्यातील वादाची बातमी चाहत्यांना पचवणे कठीण जात आहे.
जरी दोन्ही बाजूंनी यावर अद्याप कोणतेही जाहीर वक्तव्य केले नसले, तरी या हंगामातील काही असामान्य घडामोडींकडे चाहत्यांनी लक्ष वेधले आहे. आयपीएल २०२६ च्या काही टप्प्यांत धोनी रणनीती आखण्याच्या प्रक्रियेत फारसा सक्रिय नव्हता, तसेच वरिष्ठ व्यवस्थापन आणि भारताचा माजी कर्णधार यांच्यात संवाद तुटल्याच्या अफवांनाही इंटरनेटवर उधाण आले आहे.
या संभाव्य वादाच्या केंद्रस्थानी रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्या संदर्भातील 'ट्रेड' (खेळाडूंची अदलाबदली) संदर्भातील चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ खेळाडू आणि संघाच्या भविष्यातील नेतृत्वाच्या नियोजनाबाबत अंतर्गत पातळीवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये आपल्याला पूर्णपणे विश्वासात घेतले गेले नाही, यावर धोनीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
यात रवींद्र जडेजाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा जुन्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या काही हंगामांत जडेजा आणि सीएसके व्यवस्थापनातील संबंध चढ-उतारांचे राहिले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला चेन्नईच्या संघात आणण्याच्या हालचालींवरून, सीएसके व्यवस्थापन धोनीनंतरच्या काळासाठी आक्रमकपणे पावले टाकत असल्याचे संकेत मिळत आहेत. या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसली, तरी डिजिटल विश्वात याच मुद्द्यावरून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
सध्या तरी एमएस धोनीने सीएसके सोडण्याच्या किंवा या वादाच्या व्हायरल वृत्तावर जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, एका ताज्या घडामोडीने या चर्चांमध्ये आणखीच तेल ओतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोनी चेन्नईहून थेट आपल्या रांची येथील घरी परतला असून, तो अहमदाबाद येथे होणाऱ्या सीएसकेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी संघासोबत प्रवास करणार नाही. सीएसकेचा संघ जर आयपीएल २०२६ च्या प्ले-ऑफसाठी पात्र ठरला, तरच धोनी पुन्हा संघाशी जोडला जाईल, असे समजते.
जोपर्यंत धोनी किंवा चेन्नई सुपर किंग्स अधिकृतपणे यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत या चर्चा थांबण्याची चिन्हे नाहीत. परंतु, एक गोष्ट नक्की की एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हे नाते कटू मोडावर संपण्याची शक्यता, हा आयपीएल २०२६ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक विषय ठरला आहे.