कोलकाता : ४३ व्या वयातही एमएस धोनीचा जलवा कायम आहे. आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर थालाने असा एक विक्रम केला आहे, जो मोडणे जवळजवळ अशक्य आहे. धोनीने आयपीएल इतिहासात एक अनोखं शतक झळकावलं आहे.
एम.एस. धोनी आयपीएल इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे, जो 100 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने बुधवारी (दि. 7) IPL 2025 च्या 57व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध हा पराक्रम केला. धोनीने 18 चेंडूंमध्ये एक षटकार मारत 17 धावा केल्या.
धोनीच्या नाबाद खेळीचा फायदा चेन्नई सुपर किंग्सला झाला. त्यांनी पराभवाची मालिका थांबवत कोलकाता नाइट रायडर्सला त्यांच्या घरच्या मैदानावरच दोन चेंडू राखून दोन गडी राखून हरवलं. सीएसकेचा हा 12 सामन्यांतील तिसरा विजय ठरला. ‘पिवळ्या जर्सी’चा हा संघ या आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याच्या बाबतीत धोनीच्या जवळपास कोणीही नाही. दुस-या स्थानावर थालाचा सहकारी रवींद्र जडेजा आहे. जड्डू 80 वेळा नाबाद राहिला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू पोलार्ड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तो 52 वेळा नाबाद राहिला आहे. आरसीबीचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक या यादीत चौथ्या स्थानावर आहे, तो 50 वेळा नाबाद राहिला आहे. लखनौ सुपरजायंट्सचा डेव्हिड मिलर 49 वेळा नाबाद राहिला असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.
एमएस धोनी : 100
रवींद्र जडेजा : 80
किरॉन पोलार्ड : 52
दिनेश कार्तिक : 50
डेव्हिड मिलर : 49
ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्जने 19.4 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. सीएसकेचा फिरकी गोलंदाज नूर अहमदला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, त्याने चार षटकांत 31 धावा देत चार बळी घेतले.