MS Dhoni IPL 2026 file photo
स्पोर्ट्स

MS Dhoni IPL 2026: 'यलो जर्सी'मध्ये धोनीचा चेपॉकवर शेवटचा सामना? 'थाला' भावूक; पराभवानंतरही चाहते थांबले

सामन्यातील पराभवानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी मैदानाची फेरी मारून चाहत्यांचे आभार मानले. धोनी अतिशय शांतपणे बाउंड्री लाईनवरून चालत चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करत होता.

मोहन कारंडे

MS Dhoni IPL 2026

चेन्नई: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या हातातून सामना निसटला आणि त्यासोबतच त्यांचे प्लेऑफचे गणितही अवघड झाले आहे. या पराभवामुळे चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आले आहे. मात्र, सामना संपून बराच वेळ झाला तरी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील गर्दी जागेवरून हलली नव्हती. स्कोअरबोर्डवरील पराभवापेक्षा चाहत्यांचे लक्ष मैदानावर उपस्थित असलेल्या महेंद्रसिंग धोनीवर खिळले होते.

धोनी १३ व्या सामन्यातही मैदानावर नाहीच! चेपॉक भावूक

चेन्नईतील घरच्या मैदानावरील या लढतीसाठी धोनी संघासमवेत होता. शिवाय, त्याने कसून सरावही केला होता. त्यामुळे, येथे तो अंतिम एकादशमध्ये समाविष्ट असेल, अशी आशा होती. पण, प्रत्यक्षात चेन्नईच्या साखळीतील १४ पैकी या १३ व्या लढतीतही धोनी खेळलाच नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच चेन्नईच्या घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात चाहते अस्वस्थ झाले होते. पिवळ्या जर्सीतील धोनीला ते कदाचित शेवटचे प्रत्यक्ष मैदानात पाहत होते. धोनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, कोणतेही निरोपाचे भाषण नव्हते, की कोणताही भावूक सत्कार समारंभ नव्हता. तरीही, चेपॉकमधील वातावरण नेहमीपेक्षा भावूक झाले होते. जणू काही या मैदानालाही जाणीव झाली होती की, धोनीचा मैदानातील काळ आता संपत आला आहे.

फिटनेसच्या समस्येमुळे धोनी या संपूर्ण हंगामात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याच्या अनुपस्थितीची उणीव संपूर्ण सामन्यात जाणवत होती. धोनीशिवाय मैदानावर उतरलेली चेन्नईची टीम नेहमीच अपूर्ण वाटते, पण चेपॉकवर तर हा रिकामेपणा अधिकच जाणवतो. आपल्या 'थाला'ला पुन्हा एकदा मैदानात उतरताना, यष्टिरक्षण करताना आणि यष्टीमागील त्याच्या कडक सूचना ऐकण्यासाठी चाहते आतुर होते, मात्र काल चाहत्यांना त्याला लांबूनच पाहण्यावर समाधान मानावे लागले.

फोटो सेशन दरम्यान स्टेडियममध्ये प्रचंड जल्लोष

दोन डावांच्या मध्यंतरात धोनीसाठी स्टेडियममध्ये सर्वात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. चेन्नईच्या संघाने घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यानंतर परंपरेनुसार टीम फोटोसाठी मैदानावर गर्दी केली होती. त्यावेळी धोनी सीएसकेच्या जर्सीमध्ये मैदानावर चालत आला. धोनीच्या केवळ उपस्थितीने भावूक वलय प्राप्त झाले होते. हजारो चाहत्यांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली. चेपॉकवर पिवळ्या जर्सीत उभा असलेला धोनी केवळ एक खेळाडू नव्हता, तर ते चेन्नईच्या गेल्या दोन दशकांच्या अस्मितेचे, निष्ठेचे, शांततेचे आणि नेतृत्वाचे प्रतीक होते. मात्र, यावेळच्या टाळ्यांमध्ये एका अनामिक भीतीची छटा स्पष्ट जाणवत होती. 'धोनीला चेपॉकवर खेळाडू म्हणून पाहण्याची ही शेवटची वेळ तर नाही ना?' असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

सामन्यातील पराभवानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी मैदानाची फेरी मारून चाहत्यांचे आभार मानले. खेळाडू चाहत्यांच्या दिशेने जर्सी आणि इतर वस्तू फेकत असताना, धोनी अतिशय शांतपणे बाउंड्री लाईनवरून चालत चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करत होता. पराभवानंतरही एकही चाहता मैदान सोडायला तयार नव्हता.

धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत नेहमीच गूढ राहिले आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आणि फिटनेसच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रत्येक हंगामात त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगतात. धोनीने नेहमीच यावर थेट बोलणे टाळले असून, निर्णय भविष्यावर सोडला आहे. पण यंदाचा हंगाम पूर्वीपेक्षा अधिक अनिश्चिततेचा वाटत आहे. धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांचे नाते कधीच शब्दांचे नव्हते, ते भावनेचे होते. सोमवारी रात्री चेपॉकवर जे पाहायला मिळाले, ते कोणत्याही भाषणापेक्षा खूप मोठे होते.

चेन्नई सुपर किंग्जचा लीग स्टेजमधील अजून एक सामना बाकी असून, इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचे प्लेऑफचे भवितव्य अवलंबून आहे. धोनीने अद्याप निवृत्तीवर मौन बाळगले असले, तरी सोमवारी रात्री चेपॉक स्टेडियमने एका युगाचा अंत जवळ आल्याची शक्यता अनुभवली आणि संपूर्ण स्टेडियम भावूक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT