स्पोर्ट्स

MS Dhoni Controversy : धोनीने कधीही युवराजला डच्चू देण्यास सांगितले नाही : माजी मुख्य निवडकत्याचा खळबळजनक खुलासा

MS Dhoni vs Yuvraj Singh : ‘धोनीने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि त्याला मी कधीही माफ करणार नाही,‌’

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील गेल्या दशकातील सर्वात मोठा वाद म्हणजे युवराज सिंगची संघातून गच्छंती. युवराजचे वडील योगराज सिंग यांनी अनेकदा याला महेंद्रसिंग धोनीला जबाबदार धरले आहे. मात्र, भारताचे माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांनी आता यावर मौन सोडले असून योगराज सिंग यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. द विकी ललवाणी शो या यूट्यूब चॅनेलवर बोलताना संदीप पाटील यांनी या प्रकरणावर अधिकृतपणे भाष्य केले आहे.

संदीप पाटील यांनी चार वर्षे निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. या काळात त्यांनी सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांसारख्या मोठ्या नावांना संघातून वगळण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयांवर त्यावेळी मोठी टीका झाली होती; परंतु आज अनेक वर्षांनंतर पाटील यांनी त्यामागची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलाखतीने भारतीय क्रिकेटच्या पडद्यामागील राजकारणावर आणि निवडीच्या कठीण प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

धोनीवरचे आरोप चुकीचे

संदीप पाटील यांनी स्पष्ट केले की, निवड समितीच्या कोणत्याही बैठकीत, दौऱ्यावर किंवा सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीने एकदाही युवराज सिंगला संघातून बाहेर काढण्याची मागणी केली नव्हती. उलट तो नेहमी खेळाडूंना साथ देणारा कर्णधार राहिला आहे. युवराजला संघातून वगळण्याचा निर्णय हा पूर्णपणे निवड समितीचा होता. धोनीने या प्रक्रियेत कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा समितीच्या निर्णयाला विरोधही केला नाही. त्याचा निवड समितीवर पूर्ण विश्वास होता, असे संदीप पाटील यांनी सांगितले.

युवराजचे वडील योगराज सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा धोनीवर टीका केली होती. ‌‘धोनीने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि त्याला मी कधीही माफ करणार नाही,‌’ असे ते म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर संदीप पाटील यांच्या खुलाशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. संदीप पाटील म्हणाले की, ‌‘एका वडिलांना आपल्या मुलाबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक आहे; परंतु ते चुकीच्या व्यक्तीला दोष देत आहेत. युवराज हा एक महान खेळाडू आहेच, पण त्याला संघात स्थान न मिळण्यामागे कर्णधार धोनीचा हात नव्हता.

संदीप पाटील यांच्या या स्पष्टीकरणामुळे भारतीय क्रिकेटमधील एक जुना वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. युवराज सिंगने 2011 च्या विश्वचषकात कॅन्सरशी झुंज देत भारताला विजय मिळवून दिला होता, ज्यामुळे त्याच्याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र, संघ निवडीच्या तांत्रिक बाबींमध्ये कर्णधाराला दोष देणे चुकीचे असल्याचे आता समोर येत आहे.

सचिन तेंडुलकरला बसलेला धक्का

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या काळाबद्दल बोलताना पाटील यांनी सांगितले की, जेव्हा निवड समितीने सचिनशी चर्चा केली, तेव्हा त्यांना सचिनच्या प्रतिक्रिया पाहून धक्का बसला होता. पाटील म्हणाले, ‌‘सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज खेळाडूला संघातून बाहेर काढणे किंवा त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करणे हे निवड समितीसाठी अत्यंत कठीण आणि भावुक क्षण होते.

गौतम गंभीरचा अजूनही राग

गौतम गंभीरसोबतच्या संबंधांवर भाष्य करताना संदीप पाटील यांनी सांगितले की, गंभीरचा राग अजूनही कायम आहे. ‌‘गौतम गंभीर आता माझ्याकडे पाहतही नाही. मला वाटते की त्याला अजूनही त्या निर्णयाचा राग आहे,‌’ असे पाटील यांनी मान्य केले.

कोहली-कुंबळे वादाशी तुलना

संदीप पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळातील काही अपयशांची तुलना विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील प्रसिद्ध वादाशी केली. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील समन्वयाचा अभाव कसा संघाचे नुकसान करू शकतो, यावर त्यांनी भाष्य केले. निवड समितीमध्ये असताना त्यांनाही अनेकदा अशा कठीण परिस्थितींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT