IPL 2026 MS Dhoni practice video CSK
चेन्नई: आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने या सराव सत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
CSK ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर धोनीच्या फलंदाजीचे काही क्षण शेअर केले आहेत. यामध्ये तो आपल्या 'डिफेन्स' आणि 'बॅक-फूट' शॉट्सवर काम करताना दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना संघाने म्हटले आहे की, "तो जेव्हा जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा ती एक पर्वणीच असते. सुपरफॅन्स, तुम्हाला माहीतच आहे की ही कसली वेळ आहे!"
कर्णधार ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला, तरी चेन्नईसाठी आजही धोनी हाच मुख्य आकर्षण आहे. पाचवेळा आयपीएल चषकावर नाव कोरणारा चेन्नईचा संघ यंदा सहाव्या जेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरेल.
गेला हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी निराशाजनक ठरला होता. १४ सामन्यांपैकी केवळ ४ विजय मिळवून संघ गुणतालिकेत तळाला राहिला होता. धोनीने गेल्या हंगामात १३ डावांत २४.५० च्या सरासरीने आणि १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केल्या होत्या. गायकवाडच्या अनुपस्थितीत त्याने काही सामन्यांत नेतृत्वाची धुराही सांभाळली होती.
राजस्थान रॉयल्सकडून यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ट्रेडद्वारे चेन्नईत सामील झाल्यामुळे धोनीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२५ च्या कठीण हंगामानंतर धोनी यावर्षी कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे डोळे लागून आहेत.
धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने २७८ सामन्यांत ३८.८० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राईक रेटने ५,४३९ धावा केल्या आहेत. यात २४ अर्धशतकांचा समावेश असून ८४* ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
गेल्या हंगामात डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे आणि उर्वील पटेल यांसारख्या युवा खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली होती. यावर्षी लिलावात चेन्नईने उत्तर प्रदेशचा अष्टपैलू प्रशांत वीर आणि राजस्थानचा यष्टिरक्षक कार्तिक शर्मा यांना प्रत्येकी १४.२० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. आयपीएल इतिहासातील हे सर्वात महागडे 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले) खेळाडू ठरले आहेत.