MS Dhoni Birthday :
रांची : भारताचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धांमधील तिन्ही ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार असलेल्या धोनीने आपला ४४ वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला. याचे फोटो समोर आले आहेत. त्याने झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (JSCA) आपल्या सहकाऱ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
केक कापतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीने स्लीव्हलेस काळा टी-शर्ट घातलेला आहे आणि केक कापत आहे. त्याच्यासोबत जेएससीएचे अध्यक्ष अजय नाथ शाहदेव यांच्यासह काही कर्मचारी उपस्थित आहेत. धोनी "धन्यवाद मित्रांनो," असे केक कापताना म्हणत आहे. यावेळी माही खूप आनंदी दिसत होता. धोनीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (BCCI) शुभेच्छा दिल्या आहेत.
धोनी आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकिर्दीत मैदानावर आपल्या शांत आणि उत्कृष्ट कर्णधारपदाच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व प्रकारांमध्ये अव्वल स्थान गाठले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारत डिसेंबर २००९ पासून १८ महिन्यांसाठी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. संघाने २०११ मध्ये ५० षटकांचा विश्वचषक आणि २००७ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता.
धोनीचा क्रिकेटच्या इतिहासातील प्रवास हा सर्वात प्रेरणादायी प्रवासांपैकी एक आहे. त्याने संघाचे नेतृत्व करताना आयसीसी टी-२० विश्वचषक २००७, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि एक 'पॉवर हिटर' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, वेळेनुसार त्याने स्वतःला एका 'फिनिशर'च्या भूमिकेत घडवले. तो वेळेनुसार आक्रमक फलंदाजी करण्यासोबतच परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्यात माहिर होता.
चेन्नई सुपर किंग्समध्ये 'थाला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने भारतासाठी ९८ टी-२० सामने खेळले. १२६.१३ च्या स्ट्राईक रेटने ३७.६० च्या सरासरीने १,६१७ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५६ धावा आहे. कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, धोनीने ९० सामने खेळले, ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या. त्याने सहा शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आणि २२४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १४ वा आहे. कर्णधार म्हणून त्याने ६० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी २७ सामने जिंकले, १८ सामने गमावले आणि १५ सामने अनिर्णित राहिले.
धोनी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला पहिल्या क्रमांकावर नेले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्याने २०१०-११ आणि २०१२-१३ च्या मालिकेत हा पराक्रम केला होता. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली ७२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले, ज्यापैकी ४१ जिंकले आणि २८ गमावले, तर एक सामना बरोबरीत सुटला आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याची विजयाची टक्केवारी ५६.९४ आहे.
आयसीसी विजेतेपदासाठी भारताला मार्गदर्शन करण्याव्यतिरिक्त, त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सला (CSK) फ्रँचायझीचा गौरव मिळवून दिला आहे. त्याने सीएसकेला २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने २०१० आणि २०१४ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० चे विजेतेपद पटकावले आहे. २०१६ ते २०१७ मध्ये सीएसकेवर बंदी घातल्यावर धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. आयपीएलमध्ये धोनीने २७८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राइक रेटने ५,४३९ धावा केल्या आहेत. त्याने स्पर्धेत २४ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच्या नावावर १५८ झेल आणि ४७ यष्टीचित (stumpings) आहेत.