ह्युस्टन; वृत्तसंस्था : फिफा विश्वचषक स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात मोरोक्कोने सहयजमान कॅनडाचा ३-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. येथील एनआरजी स्टेडियमवरील या लढतीत मोरोक्कोचा स्टार मिडफिल्डर अझेदिन ओनाही दोन गोलसह विजयाचा शिल्पकार ठरला.
सामन्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या संघाने आक्रमक खेळ केला. प्रशिक्षक जेसी मार्श यांच्या रणनीतीनुसार कॅनडाने मोरोक्कोच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवला होता. ११ व्या मिनिटाला कॅनडाच्या तानी ओलुवासेयीला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, पण मोरोक्कोचा अनुभवी गोलकीपर यासिन बोनो याने अप्रतिम बचाव करत कॅनडाला यश मिळू दिले नाही. सामन्याच्या अवघ्या २२ व्या मिनिटाला मोरोक्कोला मोठा झटका बसला. या विश्वचषकात मोरोक्कोसाठी सर्वाधिक ३ गोल करणारा त्यांचा मुख्य फॉरवर्ड इस्माईल सायबारी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी सुफियान राहिमीला मैदानावर उतरवण्यात आले.
पहिल्या हाफमध्ये बॅकफूटवर असलेल्या मोरोक्कोने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच ५० व्या मिनिटाला सामन्याचे चित्र पलटवले. कर्णधार अश्रफ हकिमीने घेतलेल्या फ्री-किकवर उत्कृष्ट चाल रचत अझेदिन ओनाहीने डी-बॉक्सच्या बाहेरून अचूक लाँग-रेंज शॉट मारत चेंडू थेट नेटमध्ये धाडला. कॅनडाचा गोलकीपर मॅक्सिम क्रेपेउ याला हा गोल रोखण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि मोरोक्कोने १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पिछाडीवर पडल्यानंतर कॅनडाने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. कॅनडाचा कर्णधार अल्फान्सो डेव्हिस दुखापतीमुळे सुरुवातीला बदली खेळाडू म्हणून बेंचवर होता, त्यालाही संघाने मैदानात उतरवले. मात्र, मोरोक्कोच्या भक्कम डिफेन्सने कॅनडाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सामन्याच्या ८२ व्या मिनिटाला पुन्हा एकदा अझेदिन ओनाहीने मोरोक्कोसाठी दुसरा गोल करत आघाडी भक्कम केली तर रहिमीने भरपाई वेळेत ९०+८ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाला ३-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला.
पहिल्या हाफमध्ये तब्बल ६ यलो कार्ड!
दोन्ही बाजूंच्या खेळाडूंमध्ये मैदानात प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला. रेफ्री मायकेल ऑलिव्हर यांनी पहिल्या हाफमध्येच तब्बल ६ यलो कार्डस् दिली. या विश्वचषकातील कोणत्याही एका सामन्यात मिळालेल्या कार्डस्चा हा सर्वाधिक आकडा आहे.
९ जुलैला रंगणार उपांत्यपूर्व सामना
ऐतिहासिक विजयासह मोरोक्कोचा संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आता ९ जुलै रोजी बोस्टन येथे होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांचा सामना फ्रान्स-पॅराग्वे यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.