पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-इराण युद्धात मोठा फटका आता भारतीय फुटबॉल संघालाही बसला आहे. देशातील दिग्गज फुटबॉल दिग्गज संघ अशी ओळख असणार्या मोहन बागान (Mohun Bagan) संघ ऑक्टोबरच्या सुरुवातीला इराणला गेला नाही. यामुळे आता संघाला आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन चॅम्पियन्स लीगमधून बाहेर काढले आहे, अशी घोषणा आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) आज (दि. ७) केली. तसेच मोहन बागानने या स्पर्धेत खेळलेले सर्व सामने शून्य आणि निरर्थक मानले जातील, असेही स्पष्ट केले आहे.
इस्रायल-इराण युद्धामुळे मध्य पूर्वत सध्या प्रचंड तणाव आहे. इस्त्रायलचा गाझासह लेबनॉन, इराण आणि सीरिया यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. मोहन बागानचा समावेश असलेल्या एएफसी चॅम्पियन्स लीग टू सामन्याच्या पूर्वसंध्येला इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराणमधील अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून मोहन बागान सुपर जायंटने 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी या पश्चिम आशियाई देशात न जाण्याचा निर्णय घेतला होता.मोहन बागानने एएफसीला पत्र लिहून त्यांच्या खेळाडूंना इराणला जाण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते आणि मॅच पुन्हा शेड्यूल करण्यासाठी किंवा तटस्थ ठिकाणी हलवण्याची प्रशासकीय समितीला विनंती केली होती.
आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) म्हटले आहे की, "AFC लीग 2 2024/25 स्पर्धेच्या नियमावलीच्या नियम 5.2 नुसार, आशियाई फुटबॉल महासंघाने पुष्टी केली की भारताच्या मोहन बागान सुपर जायंट्सला 2 ऑक्टोबर 2024 रोजी ट्रॅक्टर एफसी विरुद्धच्या सामन्यासाठी तबरीझला पोहोचण्यात अपयशी ठरल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे," ACL 2 नंतर त्याला स्पर्धेतून काढून टाकण्यात येईल. अशा परिस्थितीत, मोहन बागान सुपर जायंटने खेळलेले सर्व सामने स्पर्धेच्या नियम 5.6 नुसार रद्द करण्यात आले आहेत आणि ते अवैध मानले गेले आहेत. स्पर्धेच्या कायद्या 8.3 नुसार, गट अ मध्ये अंतिम क्रमवारी ठरवताना क्लबच्या सामन्यांमध्ये मिळालेले कोणतेही गुण आणि गोल विचारात घेतले जाणार नाहीत. हे प्रकरण आता संबंधित एएफसी समितीकडे (त्यांच्या) निर्णयासाठी योग्य म्हणून पाठवले जाईल," असे आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) म्हटले आहे.
मोहन बागानने 18 सप्टेंबर रोजी घरच्या मैदानावर ताजिकिस्तानच्या एफसी रावशान विरुद्ध गोलशून्य बरोबरी साधली. 28 सप्टेंबर रोजी बंगळुरू एफसी विरुद्ध इंडियन सुपर लीग सामना संपवून ड्युरंड कप उपविजेता बेंगळुरूहून इराणला जाणार होता. मात्र आता या सामन्यांमध्ये मिळालेले कोणतेही गुण आणि गोल विचारात घेतले जाणार नाहीत.