पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC)चे प्रमुख मोहसिन नक्वी यांचा आणखी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. आधी तर त्यांनी भारतीय संघाची आशिया चषकाची ट्रॉफी चोरली आणि विजेत्या संघाला सुपूर्द करण्याऐवजी ACC च्या दुबईस्थित मुख्यालयात बंद करून ठेवली. आता तर त्यांनी ही ट्रॉफी एसीसीच्या मुख्यालयातूनही हलवून अबु धाबीमध्ये अज्ञात स्थळी ठेवल्याचे वृत्त समोर येत आहे. नक्वी हे एसीसीचे प्रमुख आहेत, तसेच ते पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आणि पीसीबीचे प्रमुख आहेत.
पहलग्राम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय संघाने आशिया चषकाच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केले नव्हते. २८ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ५ विकेट्सनी पराभूत केले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्या हातून ट्रॉफी आणि पदके स्वीकारण्यास नकार दिला होता.
नक्वी यांनी देखील यूएई बोर्डाचे किंवा इतर कोणत्याही आशियाई बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्याऐवजी ती स्वतःच्या हातूनच देण्याचा हट्टीपणा दाखवला. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बराच वेळ भारतीय संघाची वाट पाहत राहिले, परंतु सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तिळपापड झालेल्या नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी घेऊन त्यांच्या हॉटेलच्या खोलीत गेले.
या प्रकारानंतर नक्वी यांच्या त्या कृत्याविरोधात बीसीसीआयने कडक भूमिका घेतली. त्यानंतर ते ट्रॉफी सुपूर्द करण्यास तयार झाले, परंतु त्यांनी ही बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी टीम इंडियाच्या कर्णधारासोबत येऊन माझ्याच हातून घ्यावी लागेल, अशी अट घातली. या सगळ्या दरम्यान, आता नक्वी यांनी ती ट्रॉफी एसीसीच्या मुख्यालयातूनही अज्ञात स्थळी हलवली आहे.
एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, आशिया चषकाची ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या मुख्यालयात उपलब्ध नाही. अहवालात म्हटले आहे की, ‘काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एसीसीच्या मुख्यालयाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी एसीसी कार्यालयात ट्रॉफीबद्दल विचारणा केली. मात्र, तेथील तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना ट्रॉफी इथून हलवण्यात आली आहे. ती ट्रॉफी नक्वी यांच्या ताब्यात अबु धाबीमध्ये अज्ञात स्थळी आहे,’ असे सांगितले.