अहमदाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात करत भारताने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या भावना अनावर झाल्या होत्या. या आनंदोत्सवादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपले मनोगत व्यक्त करताना संघातील आपल्या भूमिकेवर भाष्य केले. अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नसले तरी, संघाच्या विजयात आपले योगदान काय होते, यावर त्याने मिश्किल भाष्य केले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विजयानंतर स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सिराजसोबत फिरकीपटू कुलदीप यादवदेखील उपस्थित होता. दोघांच्या चेहऱ्यावर विश्वविजेतेपदाचा आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंना केवळ प्रत्येकी एक-एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती.
विजयानंतर मैदानावर जल्लोष सुरू असताना अँकरने सिराज आणि कुलदीपला संघाच्या यशातील त्यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारला. ‘या विजयात तुम्हा दोघांची भूमिका किती महत्त्वाची आहे?’ असे विचारले असता सिराजने खळखळून हसतच उत्तर दिले, ‘आमची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असते. मैदानाबाहेर राहून सहकाऱ्यांना सतत पाणी पोहोचवणे, नेट्समध्ये गोलंदाजी करणे आणि संघातील वातावरण सकारात्मक ठेवणे ही आमची जबाबदारी होती. एक खेळाडू म्हणून प्रत्येकाला मैदानावर उतरून खेळावेसे वाटतेच, मात्र जेव्हा 'टीम कॉम्बिनेशन'चा प्रश्न येतो, तेव्हा संघहिताला सर्वोच्च प्राधान्य असते. संघाच्या हितासाठी जो निर्णय घेतला जाईल, त्यासोबत आम्ही ठामपणे उभे होतो,’ अशी टीप्पणी केली.
टीव्ही अँकरने पुढे विचारले की, ‘या विश्वचषकातील विजयाचे सूत्र काय?’ असे विचारले असता सिराजने ‘संपूर्ण संघ’ असे उत्तर दिले. याला दुजोरा देत कुलदीपनेही हा सांघिक प्रयत्नांचा विजय असल्याचे सांगितले. ‘पुन्हा एकदा विश्वविजेता’ झाल्याबद्दल विचारले असता सिराज भावूक होऊन म्हणाला, ‘सुरुवातीला मी विश्वचषक संघाचा भागही नव्हतो. पण नियतीने कदाचित हीच संहिता लिहिली होती, म्हणूनच मला येथे येण्याची संधी मिळाली आणि विश्वविजेता बनवले. दैवाचे फासे कोणीही बदलू शकत नाही.’
यावेळी कुलदीप यादवनेही आपले मत मांडले. तो म्हणाला, ‘तुमचे कर्म खूप महत्त्वाचे असते. तुम्ही जेवढे चांगले प्रयत्न कराल, तेवढेच चांगले फळ मिळते. गेल्या दीड वर्षांपासून आमची तयारी सुरू होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आम्ही ज्या जिद्दीने पुनरागमन केले, त्याचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. सलग तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणे हा एक सुखावह अनुभव आहे.’
२०२६ च्या या टी-२० विश्वचषकात सिराजला केवळ अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले होते. सुरुवातीला तो संघात नव्हता, मात्र हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्यामुळे सिराजचा तातडीने संघात समावेश करण्यात आला होता. दुसरीकडे, कुलदीप यादवलादेखील या स्पर्धेत केवळ पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.